

नागपूर: नागपूर-जबलपूर महामार्गावर देवलापार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वळंबा परिसरात बुधवारी (दि.२९) झालेल्या एका विचित्र आणि भीषण अपघातात ट्रॅव्हल्स चालकासह एकूण दहापेक्षा अधिक जण जखमी झाले, तर तिघांचा जागीच मृत्यू झाला.
या भीषण अपघातात कपिल मोहनलाल सहानी (वय ५०, रा. गोरखपूर रोड, जबलपूर), अमित अनिल अग्रवाल (वय ५१, रा. भेडाघाट रोड, जबलपूर), संदीप केदारनाथ सोनी (वय ५१, रा. भेडाघाट रोड, जबलपूर) अशी मृत व्यक्तिंची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूरहून नागपूरच्या दिशेने येणारी 'सत्यम ट्रॅव्हल्स'ची बस (एम पी २२ झेड जी ५८२२) आणि नागपूरहून जबलपूरकडे जाणारी कार (एम पी २० झेड ए ००१४) यांच्यात हा अपघात झाला. कारचालकाने भरधाव वेगात समोर आलेल्या एका मोटारसायकलस्वाराला वाचवण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात कारचालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दुसऱ्या लेनमध्ये जाऊन समोरून येणाऱ्या ट्रॅव्हल्सवर धडकली. या जोरदार धडकेमुळे ट्रॅव्हल्स अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या (आर जे ११ जी सी ६६६३) क्रमांकाच्या एका ट्रकवर जाऊन आदळली.
या अपघातात कारचा चेंदामेंदा झाल्याने कारमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. जखमींना तातडीने देवलापार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना पुढील उपचारांसाठी नागपुरातील विविध खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.