

ED Raid on Jewellers Nagpur
नागपूर: नागपुरातील सराफा व्यावसायिक, सराफा संघटनेचे माजी अध्यक्ष पुरुषोत्तम कावळे यांच्या सागर ज्वेलर्स या प्रतिष्ठानावर ईडीने आज (दि.२३) सकाळपासून धाडसत्र सुरू केले आहे. पहाटे ईडीच्या पथकाने स्थानिक पोलिसांच्या मदतीने एम्प्रेस सिटी येथून पुरुषोत्तम कावळे यांना ताब्यात घेतले. यानंतर दुसऱ्या पथकाने इतवारी सराफा बाजारातील सागर ज्वेलर्स या त्यांच्या प्रतिष्ठानावर देखील धाडीची कारवाई सुरू केली.
बाहेर तहसील पोलिसांचा आणि सशस्त्र पोलिसांचा पहारा तर आत ईडीचे अधिकारी व त्यांचे पथक आवश्यक कागदपत्रांची तपासणी करण्यात गुंतले होते. यावेळी या कारवाईत बरीच आक्षेपार्ह कागदपत्रे ईडीने आपल्या ताब्यात घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली. नागपूर, विदर्भात सराफा व्यावसायिकांमध्ये पुरुषोत्तम कावळे हे मोठे प्रस्थ मानले जाते. काही दिवसांपूर्वी अकोला, यवतमाळ, अमरावती येथे देखील सराफा व्यावसायिकांवर आयटीने धाडीची कारवाई केली. नागपूर, अमरावती, संभाजीनगर येथील आयकर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा या पथकात समावेश होता.
या धाडीनंतर विदर्भातील सराफा व्यावसायिकांमध्ये खळबळ माजली होती. आता ईडीने, सक्त वसुली संचालनालयाने ही कारवाई करताच सराफा मार्केटमध्ये अनेकांचे धाबे दणाणले आहे.