

नागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर,भगवान गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी यावर्षी बुधवारी लाखो आंबेडकरी अनुयायी दीक्षाभूमीत आले, नतमस्तक झाले. अनेक देशांमध्ये युद्धाची परिस्थिती आहे, अशा परिस्थितीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्धांचेच विचार मार्गदर्शक आहे, अशी भावना बाबासाहेबांच्या अनुयायींनी व्यक्त केली.
भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारला, त्या घटनेला आज 69 वर्ष पूर्ण झालीत. धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने देशभरातील डॉ. बाबासाहेबांचे लाखो अनुयायी अभिवादन करण्यासाठी गेल्या दोन तीन दिवसात नागपुरात एकवटले. गेल्या अनेक वर्षांच्या तुलनेत यावर्षी दीक्षाभूमीत येणाऱ्या आंबेडकरी अनुयायांच्या संख्येत मोठी वाढ झाल्याचे दिसून आले. गेली दोन वर्षे राजकीय मंडळींना व्यासपीठावर स्थान नसल्याने दीक्षाभूमी स्मारक समिती पदाधिकारी आणि देशविदेशातून आलेले प्रतिनिधी, सामाजिक मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. गैरसमजातून घडलेल्या मध्यंतरीच्या काही घडामोडींनी दीक्षाभूमीवरील विकासकामे खोळंबली अशी खंत स्मारक समितीचे सचिव डॉ राजेंद्र गवई यांनी व्यक्त केली.
पवित्र दीक्षाभूमी भारतातील बौद्ध धर्मीयांसाठी एक अत्यंत महत्त्वाचे आणि पवित्र श्रद्धास्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली महास्थविर चंद्रमणी यांच्याकडून बौद्ध धर्माची दीक्षा प्राप्त केली.त्यानंतर डॉ. बाबासाहेबांनी पाच लाख अनुयायींना बौद्ध धर्माची दीक्षा दिली. तेव्हापासून या पवित्र स्थानाचे दीक्षाभूमी असे नामकरण झाले. यावर्षी देखील स्मारक समितीचे अध्यक्ष भंते सुरई ससाई यांनी त्रिदिवसीय महोत्सवात हजारो लोकांना धम्मदीक्षा दिली. बाबासाहेबांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेऊन ज्या ठिकाणी घेतली, त्या जागेवर सुरुवातीला बाबासाहेबांचा पुतळा उभा करण्यात आला. ती जागा डॉ. बाबासाहेबांच्या पदस्पर्शाने पवित्र झाल्याची भावना आंबेडकरी समाजाची असल्यामुळे ती जागा स्मारकासाठी देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने झाली. महाराष्ट्र शासनाने या जनभावनेचा आदर राखत दीक्षाभूमीची एकूण 14 एकर जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीला दिली. त्यानंतर 1978 साली स्तूपाच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली. संपूर्ण बांधकाम 2001 साली पूर्ण करण्यात आले.