Dr. Babasaheb Ambedkar Jayanti | आंबेडकरी चळवळीची साक्ष देणारा नाशिक जिल्हा

नाशिक जिल्ह्यात आंबेडकरकालीन परिवर्तनाच्या चळवळींचा राबता देश-परदेशातही प्रेरक
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Pudhari News Network
Published on
Updated on

नाशिक : प्रा. गंगाधर अहिरे

नाशिक जिल्ह्यात आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर काळातील परिवर्तनाच्या चळवळींचा इथे राहिलेला राबता देश-परदेशातही प्रेरक ठरलेला आहे. ऐतिहासिक दस्तऐवजांच्या आधाराने पुरोगामी व परिवर्तनवादी विचार चळवळींच्या येथील काही ठळक नोंदी प्रस्तुत लेखात साक्षांकित करण्याचा प्रयत्न केला आहे.

आंबेडकरकालीन आंबेडकरी चळवळ

धार्मिकदृष्टीने अस्पृश्य मानलेल्या समाजाला नाशिक येथील काळाराम मंदिरात प्रवेश असावा, यासाठी २ मार्च १९३० पासून मंदिर परिसरात सत्याग्रह सुरू झाला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे मार्गदर्शन व कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सदर सत्याग्रह जवळपास पाच वर्षे टप्प्याटप्प्याने सुरू राहिला. सत्याग्रहाच्या कालावधीत सत्याग्रहींसह डॉ. आंबेडकर आणि अग्रणी नेत्यांवर सवर्णांकडून हल्ले झाले. शेकडो सत्याग्रहींना तुरुंगवास सहन करावा लागला. परंतु येथील कर्मठ विचारांच्या धर्मपंडितांनी अस्पृश्यांना मंदिर प्रवेशाचा हक्क नाकारला. याच काळात म्हणजे २३ सप्टेंबर १९३१ रोजी नाशिक जिल्ह्यातील मुखेड गावी अस्पृश्यांनी 'पांडवप्रताप' ग्रंथाची पालखीतून मिरवणूक काढली. तेव्हा गावातील सवर्ण गावगुंडांनी अस्पृश्यांना मारहाण केली. समकाळात इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या गोलमेज परिषदेत डॉ. आंबेडकर व महत्मा गांधी यांच्यामध्ये अस्पृश्यांना स्वतंत्र मतदारसंघाच्या प्रश्नावर संघर्ष सुरू होता. मुखेडच्या एकतर्फी दंगलीचे पडसाद थेट 'लंडन टाइम्स 'वृत्तपत्रातून प्रसिद्ध झाले. परिणामी 'मीच अस्पृश्यांचा पुढारी आहे' असे जे वक्तव्य महात्मा गांधी परिषदेत करीत होते, त्यास छेद जाऊन डॉ. आंबेडकर हेच अस्पृश्यांचे खरे पुढारी आहेत, यावर शिक्कामोर्तब झाले. कारण मुखेड येथून दंगलग्रस्तांनी तसे टेलिग्राम डॉ. आबेडकरांना पाठविले होते. या पार्श्वभूमीतूनच पुढे १९३२ साली गांधी-आंबेडकरांमध्ये पुणे करार झालेला होता.

जिल्ह्यातील येवला येथे डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली १९३५ ला 'मुंबई इलाखा अस्पृश्य परिषद' झाली. या परिषदेवर काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाचा प्रभाव होता. ज्या मंदिरात कुत्र्या-मांजरांना प्रवेश आहे, परंतु हिंदू असूनही अस्पृश्यांना प्रवेश नाही म्हणून हिंदू धर्मात अस्पृश्यांची होणारी मानहानी नाकारून 'मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही.' अशी ऐतिहासिक घोषणा डॉ. आंबेडकरांनी केली. त्यातूनच पुढे १९५६ साली त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला. नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह हा अस्पृश्यांनी केलेल्या धर्मांतराची पार्श्वभूमी आहे, असे अभ्यासांती म्हणता येते.

आंबेडकरी संगीत जलसे

'आंबेडकरी संगीत जलशां'चे आद्य लेखक, निर्माते व सादरकर्ते नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे येथील शाहीर भीमराव धोंडिबा करडक हे आहेत. ४ फेब्रुवारी १९३१ साली त्यांनी नाशिकजवळील चांदोरी गावात 'सत्याग्रहाचा फार्स' असे शीर्षक असलेला 'जलसा' प्रथम सादर केला. समकाळात नाशिक येथे सुरू असलेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहाच्या पार्श्वभूमीवर सदर जलशाचे सादरीकरण करण्यात आले होते. (संदर्भ : आंबेडकरी जलसे : स्वरूप व कार्य - ले. भीमराव करडक) समकाळात प्रस्तुत जलशाच्या प्रेरणेतून व अनुकरणातून आंबेडकरनिष्ठ कलावंतांनी महाराष्ट्राभर जलसे निर्माण केले. शाहीर भीमराव करडकांनी विविध विषयांवर एकूण २५ जलशांच्या संहिता लिहून ते सादर केलेले होते, अशी माहिती त्यांनीच लिहिलेल्या 'आंबेडकरी जलसे स्वरूप व कार्य' या पुस्तकात नमूद आहे. डॉ. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान व त्यांच्या चळवळीचा आविष्कार सदर जलशांच्या संहितांमधून प्रकट होतो. शा. करडक समकालीन असलेले जलसेकार शा. शंकर पवार, केशव सुका आहेर, रामचंद्र सोनवणे, पांडुरंग पवार, रामचंद्र खंडागळे, केरूजी घेगडे, केरूबुआ गायकवाड, माधवराव आहेर, जलसेकार पगारे, भीमराव आढांगळे, बाबूराव घोलप, लक्ष्मण केदार, सोनू केदार, धनाजी अढांगळे आदी जलसेकार हे नाशिक जिल्ह्यातीलच आहेत. डॉ. भगवान ठाकूर यांचा 'आंबेडकरी जलसे' आणि डॉ. कृष्णा किरवले यांचा 'आंबेडकरी शाहिरी' हे दोन्ही संशोधनपर ग्रंथ या संदर्भात माहिती देणारे मौलिक दस्तावेज आहेत.

जलसेकारांनी पारंपरिक तमाशा आणि सत्यशोधकी जलशांच्या मूळ स्वरूपात काही बदल करून, आंबेडकरी जलसाचा आकृतिबंध साकारला होता. त्यांनी पारंपरिक तमाशाची संरचना स्वीकारली होती. परंतु तमाशातील आशय मात्र पूर्णतः नाकारला होता. सदर जलशांच्या आशय हा आंबेडकरी तत्त्वज्ञान व आंबेडकरी चळवळ‌निष्ठ होता. जलसेकारांनी तमाशातील कृष्ण, पेंद्या आणि गौळणी यांच्यातील बिभत्स संवाद आणि गौळणींचे शृंगारिक नृत्य (लावणी) नाकारले. तद्वतच देव-देवतांचे स्तवन आणि सत्यशोधक जलसांतील एकेश्वराला वंदन करण्याची प्रथाही नाकारून महामानवांना गौरविण्याचा नवा पायंडा त्यांनी पाडला होता.

  • संगीतमय कवनं, संवाद आणि फार्सच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणे.

  • बाबासाहेबांचे तत्त्वज्ञान व कर्तृत्वाचा प्रचार व प्रसार करणे

  • विषमतावादी अनिष्ट प्रथा-परंपरांचा भांडाफोड करून, समता तत्त्वाचा जागर मांडणे.

  • शहरांसह गावगाड्यातील सामान्य माणसाला आंबेडकरी चळवळीकडे आकृष्ट करणे. ही प्रमुख उद्दिष्टे आंबेडकरी जलसाच्या निर्मितीमागे होती. महाड येथील चवदार तळ्यावरील सत्याग्रह, नाशिकचा काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह, गोलमेज परिषदेतील बाबासाहेबांचे कार्य, गांधी व आंबेडकरांमधील पुणे करार, शेड्युल कास्ट फेडरेशनचे कार्य या विषयांसह; शिक्षणाचे महत्त्व, जात-धर्मातील विषमता, वेसकरकी, अनिष्ट खानपान व अंधश्रद्धा सोडण्याचे आवाहन असे काल सुसंगत विषय जलसांमधून सादर केले जात असत. साधारणपणे १९५५ च्या जवळपास 'आंबेडकरी जलशांचा' झंझावात थांबल्याने दिसून येते.

पुढील काळातील प्रबोधनकारी लोकनाट्ये, संगीत मेळे, कलापथके, शाहिरांच्या गीतांची जुगलबंदी असलेले सामने, कलापथके आणि बैठ्या गायन पार्ट्यांचा उगम जलशांच्या पोटातून झाला आहे. नाशिक कर्मभूमी असलेले महाकवी वामनदादा कर्डक हेदेखील त्या पार्श्वभूमीतूनच उदयाला आलेले आहेत, हे नाकारता येत नाही.

आंबेडकरोत्तर आंबेडकरी चळवळ

आंबेडकरोत्तर काळातही नाशिक हे आंबेडकरी चळवळीचे केंद्र म्हणून वलयांकित असल्याचे निदर्शनास येते. कर्मवीर दादासाहेब गायकवाडांचे खंदे नेतृत्व हे त्याचे महत्त्वाचे कारण. आमदार, खासदार म्हणूनही दादासाहेबांचे कर्तृत्व बहुजन समाजामध्ये नावारूपाला आलेले होते. बाबासाहेबांनी स्थापन केलेला स्वतंत्र मजूर पक्ष, शेड्युल कास्ट फेडरेशन आणि आंबेडकरोत्तर कालखंडातील 'रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया' या राजकीय संघटनांमध्ये त्यांचे नेतृत्व ललांभूत ठरले होते. १९६४ मध्ये त्यांनी उभारलेला भूमिहिनांचा देशव्यापी सत्याग्रह हजारो भूमिहीन शेतमजुरांच्या उपजीविकेसाठी फलदायी ठरला होता. बौद्धांच्या आरक्षणाचा प्रश्न, शिक्षणाचे प्रश्न, अंधश्रद्धा निर्मूलन, दलित, वंचितांसाठी विद्यार्थी वसतिगृहे व बौद्धांच्या निवासी वस्त्यांच्या निर्मितीलाही त्यांनी यशस्वीपणे चालना दिल्याचे दाखले उपलब्ध आहेत. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या चळवळीत त्यांची राहिलेली सामीलकी सहभाग व नाशिकजवळील ओझर येथे मिग विमानाचा कारखाना केंद्राकडून मिळविण्यात ते प्रमुख होते. त्यांच्या हयातीत आंबेडकरी परिवर्तनाची चळवळ उदात्त ध्येयाने प्रेरित व ऊर्जाशील होती. ॲड. हरिभाऊ पगारे आणि भावना भार्गवे यांनी लिहिलेल्या त्यांच्यावरील चरित्रग्रंथातून त्यांची सार्वजनिक उज्ज्वल कारकीर्द उजागर आहे. दादासाहेबांच्या पत्नी जिजाताई गायकवाड आणि सहकारी डॉ. शांताबाई दाणी व त्यांच्या ठिकठिकाणच्या अनुयायांमुळे त्यांचे राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक कार्य आंबेडकरी समाजासह बहुजनांना मार्गदर्शक व उत्कर्षदायी ठरल्याचे दिसून येते.

नव्वदोत्तरीच्या काळातील आंबेडकरी चळवळ

८० ते २००० ही तीन दशकं आंबेडकरी चळवळीसाठी उर्जस्वल दशकं म्हटली जातात. या काळात औरंगाबाद येथील मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतराचा लढा, गायरान जमिनीच्या प्रश्नांवरील आंदोलने, सवर्णांकडून एकतर्फी लादलेले जातीय दंगलींविरुद्धची दलितांची एकजूट, महापुरुषांच्या पुतळ्यांची विटंबनेविरुद्धचे एल्गार, रिडल्स अर्थात बाबासाहेबांनी लिहिलेलं लिटरेचर शासनाने छपावे यासाठी निघालेले यशस्वी मोर्चे, बौद्धांच्या आरक्षणाच्या चळवळी, बौद्ध विहारे, वाचनालये स्थापण्यास्तव झालेल्या चळवळी, आरपीआयचे एकीकरणाचे वारे, ओबीसींच्या प्रश्नांवर आंबेडकरवाद्यांनी रस्त्यावर उतरून केलेली आंदोलने, ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकरांच्या राजकीय चळवळीचा उदय आणि दलित साहित्याची झालेली प्रचंड निर्मिती, स्वतंत्र साहित्य संमेलने अशा अनेक घटनांनी प्रस्तुत काळ, आंबेडकरी परिवर्तनासाठी उत्कर्ष काळ होता. त्या एकूणच घडामोडींमध्ये नाशिक शहर व जिल्ह्याची सामीलकी लक्षवेधी राहिलेली होती.

महाराष्ट्रात वर्तमानात आंबेडकरी परिवर्तनाची चळवळ आवर्तात सापडली आहे, असा आरोप होत असला तरी; त्यात फारसे तथ्य नाही. नव्या जाणिवा व बदलत्या प्रश्नांना भिडण्याची क्षमता सद्यस्थितीतील चळवळीतील तरुणाईमध्ये दिसून येते. नाशिक जिल्ह्यामध्येही ते भान प्रकर्षाने प्रकाशमान असल्याचे निदर्शनास येते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news