Divya Deshmukh | दिव्याचे यश देशातील तरुणांसाठी प्रेरणादायी : मुख्यमंत्री फडणवीस

राज्‍य सरकारतर्फे ३ कोटींचे बक्षीस : जागतिक बुद्धिबळ विजयाचा नागपुरात भव्य गौरव
Divya Deshmukha
दिव्या देशमुखच्या जागतिक बुद्धिबळ विजयाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्‍थितीत नागपुरात गौरव करण्यात आला. Pudhari Photo
Published on
Updated on

नागपूर : महाराष्ट्र शासनाने क्रीडा क्षेत्राला कायम प्राधान्य दिले. आज खेळाडूंना मोठी ध्येय खुणावत असून यासाठी तंत्रशुध्द प्रशिक्षण, सकस आहार, परदेशी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन या गोष्टी आवश्यक आहेत. जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये यश मिळवायचे असल्यास या गोष्टी आवश्यक आहेत. खेळाडूंना अधिकाधिक दर्जेदार व अद्ययावत सुविधा पुरविण्याचा प्रयत्न आहे. दिव्या देशमुखने जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत मिळविलेले देदीप्यमान यश हे देशातील मुला-मुलींसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जागतिक बुद्धिबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी कविवर्य सुरेश भट सभागृह येथे नागरी सत्कार आयोजित करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्याचा सन्मान करीत तीन कोटी रुपयांचे बक्षीस प्रदान करण्यात आले. याशिवाय महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेकडूनही ११ लाख रुपयांचे बक्षिस प्रदान करण्यात आले. खासदार क्रीडा महोत्सव समितीकडून सन्मान करण्यात आला.

Divya Deshmukha
Divya Deshmukh : घरच्यांना हवी होती बॅडमिंटनपटू, पण 'या' एका गोष्टीमुळे दिव्या बनली बुद्धिबळची 'राणी'

खातेबदलानंतर प्रथमच नागपुरात आलेले क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यासह वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, आमदार सर्वश्री संदीप जोशी, अभिजित वंजारी, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष तथा आमदार परिणय फुके, क्रीडा विभागाचे अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, क्रीडा व युवक सेवा आयुक्त शीतल तेली-उगले पोलिस आयुक्त डॅा. रवींद्र सिंगल, जिल्हाधिकारी डॅा. विपीन इटनकर, महानगर पालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, दिव्याचे वडील डॉ. जितेंद्र देशमुख, आई डॉ. नम्रता देशमुख, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेशी संलग्नित जिल्हा संघटनांचे पदाधिकारी, बुद्धिबळपटू, शालेय विद्यार्थी, नागपूरकर मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, दिव्याने कमी वयात लक्ष विचलित न होऊ देत ध्येयावर लक्ष केंद्रीत केले. बुद्धिबळात उत्स्फुर्तता, एकाग्रता आणि सजगता आवश्यक असते. बुद्धिबळ हा खेळ शंभरावर देशात खेळला जातो. कधीकाळी बुद्धिबळात चीनचे वर्चस्व राहायचे. हे वर्चस्व जागतिक बुद्धिबळ स्पर्धेत कोनेरू हम्पी आणि दिव्या देशमुख हिने धडक देत मोडून काढले. दिव्याने अंतिम फेरीत वयाच्या केवळ १९ व्या वर्षी विजय मिळविला. तिने कमी वयात मोठी उंची गाठली याचा आनंद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे म्हणाले की, यशस्वी खेळाडू घडताना त्यांच्यामागे असलेले कुटुंब, प्रशिक्षक आणि व्यवस्थाही तितकीच महत्वाची असते. त्यामुळे त्यांचाही या यशात मोलाचा वाटा आहे. मुलींना संधी, योग्य प्रशिक्षण आणि प्रेरणा दिल्यास त्या जग जिंकू शकतात. दिव्याने हे परिवर्तन सिद्ध करून दाखविले आहे. हे यश सर्वांसाठी आदर्शवत आहे.

Divya Deshmukha
Divya Deshmukh | एकाच झटक्यात ‘विश्वविजेती’ अन् ‘ग्रँडमास्टर’!

जागतिक बुद्धीबळ स्पर्धा विश्वविजेती ग्रँडमास्टर दिव्या देशमुख हिने आपले मनोगत व्यक्त केले. नागपूर हे शहर माझ्यासाठी विशेष आहे. या यशानंतर पुढील जागतिक स्पर्धांसाठी आणखी जोमाने तयारी करणार असल्याचे तिने सांगितले. महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष आमदार परिणय फुके यांनी भारतात आयोजित होणाऱ्या चेस वर्ल्ड कप स्पर्धेचे आयोजन महाराष्ट्रात व्हावे अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. आयुक्त क्रीडा व युवक सेवा शीतल तेली उगले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. आभार ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी मानले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news