

बाटुमी; वृत्तसंस्था : फिडे महिला बुद्धिबळाच्या विश्वचषकात दोन्ही फायनालिस्ट भारतीय असण्याची ती पहिलीच वेळ! एका बाजूला अनुभव तर दुसर्या बाजूला तरुण जोश! एका बाजूला आधीची पिढी तर एका बाजूला आताची पिढी! क्लासिकल बुद्धिबळातील या सर्वोच्च किताबासाठी चुरस रंगत गेली. पहिले दोन डाव बरोबरीत सुटले आणि क्षणाक्षणाला विजयाचे पारडे इकडून तिकडे झुलत असताना जागतिक बुद्धिबळाला लाभली नवी ‘क्वीन’...ती म्हणजे नागपूरची अवघ्या 19 वर्षांची दिव्या देशमुख!
हा सामना केवळ दोन खेळाडूंमधील नव्हता, तर दोन पिढ्यांमधील होता. एका बाजूला होता अनुभव, तर दुसर्या बाजूला होता तरुण जोश आणि या महामुकाबल्यात, 19 वर्षीय दिव्या देशमुखने केवळ बुद्धिबळाच्या पटावरच नव्हे, तर इतिहासाच्या पानांवर आपली छाप उमटवली. दिग्गज कोनेरू हंपीचा टायब्रेकरमध्ये चित्तथरारक पराभव करत दिव्याने फिडे महिला विश्वचषक जिंकला आणि त्यासोबतच ग्रँडमास्टर बनण्याचा, स्पर्धेपूर्वी अशक्यप्राय वाटणारा, बहुमानही मिळवला.
एकीकडे 38 वर्षीय अनुभवी हंपी, जिने हा एक किताब वगळता जवळजवळ सर्व प्रमुख विजेतेपदे जिंकली, तर दुसरीकडे निर्भय आणि महत्त्वाकांक्षेने भारलेली दिव्या, यांच्यातील ही लढत विशेष लक्षवेधी ठरली. आठवड्याच्या शेवटी दोन तणावपूर्ण क्लासिकल सामने बरोबरीत सुटल्यानंतर, विजेतेपदाचा निर्णय टायब्रेकरमध्ये दडपण कसे हाताळले जाणार यावर अवलंबून होता आणि इथे दिव्याने बाजी मारली.
निर्णायक टप्प्यात हत्ती आणि प्यादी असलेल्या अंतिम डावात सामना पुन्हा बरोबरीत सुटेल, असे वाटत होते. तथापि, प्रचंड दबाव आणि टाईम प्रेशरमुळे मुळे हंपीने 40 व्या चालीवर एक मोठी चूक केली आणि इथेच दिव्याचे जेतेपद सुनिश्चित झाले. दिव्या मूळची नागपूरची असून ऑलिम्पियाडमध्ये ती तिहेरी सुवर्णजेती आहे. तिचे वडील जितेंद्र देशमुख व आई नम्रता देशमुख हे वैद्यकीय पेशात आहेत.
2002 मध्ये हंपी ग्रँडमास्टर बनल्यानंतर तीन वर्षांनी जन्मलेल्या दिव्याला विजय आवाक्यात आल्याचे लक्षात येताच अश्रू अनावर झाले. जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्यानंतर याचे वर्णन करण्यासाठी तिला शब्दही सुचत नव्हते.
नागपूरच्या या किशोरवयीन खेळाडूने जॉर्जियातील बाटुमी येथे झालेल्या या प्रतिष्ठित स्पर्धेत एकही जीएम नॉर्म नसताना प्रवेश केला होता. आता ती केवळ विश्वविजेती म्हणूनच नव्हे, तर भारताची 88 वी ग्रँडमास्टर म्हणून परतत आहे आणि देशातील बुद्धिबळाच्या दिग्गजांच्या पंक्तीत सामील झाली आहे.
दिव्या व हंपी या प्रतिष्ठेच्या जेतेपदासाठी आमने-सामने भिडले त्यावेळी, ती खर्या अर्थाने दोन युगातील लढत होती. एकीकडे, दिव्या अवघी 19 वर्षांची असून हंपी 38 वर्षांची आहे. दिव्याच्या तुलनेत हंपी बरीच अनुभवी असणे साहजिकच होते. पण, खेळात कोणतेही अंतर नसते, याचा प्रत्यय देत दिव्याने विजय खेचून आणला. आश्चर्य म्हणजे हंपीने ग्रँडमास्टर किताब पटकावला, त्यावेळी दिव्या अवघ्या तीन वर्षांची होती!