

नागपूर : मुंबई हाय कोर्टाच्या नागपूर खंडपीठाने आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार मोहन मते, आमदार सुधीर मुनगंटीवार, आमदार बंटी भांगडिया, आमदार देवराव भोंगळे यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेली याचिका निकाली काढली. काँग्रेसचे पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुडधे पराभूत उमेदवार प्रफुल्ल गुडधे, गिरीश पांडव, सतीश वारजूरकर, संतोषसिंग रावत व सुभाष धोटे यांनी या याचिका दाखल केल्या होत्या.
गेल्या विधानसभेच्या निवडणूकीत लागलेल्या निकाला विरोधात या याचिकेतून आव्हान देण्यात आले होते. भाजपाचे हे आलेले सर्व आमदार बोगस मतांच्या आधारे निवडून आल्याचा आरोप याचिकेत केला होता. भाजप निवडणूक आयोग संगनमतातून हा सर्व प्रकार झाल्याचा आरोप केला. गुडधे यांच्यासह इतरांनी या संदर्भात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती.
दक्षिण-पश्चिम नागपूर मतदारसंघातून जिंकलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरुद्ध गुडधे, दक्षिण नागपूरमधून जिंकलेले मते यांच्याविरुद्ध पांडव, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूरमधून जिंकलेले भांगडिया यांच्याविरुद्ध वारजूरकर, बल्लारपूरमधून विजयी झालेले मुनगंटीवार यांच्याविरुद्ध रावत, तर राजुरा येथून जिंकलेले भोंगळे यांच्याविरुद्ध धोटे यांनी निवडणूक याचिका दाखल केली होती. फडणवीस व इतरांनी या निवडणूक याचिकांना विरोध केला होता. या निकालामुळे मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यासह इतर चार आमदारांना दिलासा मिळाला.
देवेंद्र फडणवीस (मुख्यमंत्री, नागपूर दक्षिण-पश्चिम मतदारसंघ)
सुधीर मुनगंटीवार ( बल्लारपूर मतदारसंघ)
मोहन मते (नागपूर दक्षिण मतदारसंघ)
बंटी भांगडिया (चिमूर मतदारसंघ)
देवराव भोंगळे (राजूरा मतदारसंघ)
दरम्यान या आमदारांनी नागपूर खंडपीठामध्ये आपले म्हणने मांडले होते. आपल्याविरोधात दाखल केलेल्या याचिका फेटाळण्यात यावा असा अर्ज केला होता. या निवडणूक याचिका लोकप्रतिनिधित्व कायद्यातील कलम ८१ (१) मधील निकष पूर्ण करीत नाही. त्यामुळे या याचिका सुरुवातीच्या टप्प्यातच फेटाळून लावा, अशी विनंती फडणवीस व इतरांनी न्यायालयाला केली होती.