

नागपूर : ‘लोकतंत्र बचाओ, अराजकता हटाओ,' या घोषवाक्याखाली आयोजित महारॅलीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली देशात लोकशाही आणि संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांविरोधात वातावरण तयार केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. राहुल गांधी संविधानाशी खेळाल, तर तुमचे हात भाजल्याशिवाय राहणार नाहीत, असा थेट इशाराही फडणवीस यांनी दिला. ही लढाई भाजप, एनडीए किंवा नरेंद्र मोदी यांच्यासाठी नसून देशाचे संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
नागपूर शहरात आयोजित रॅलीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. हेमंत जोशी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आकाश फुंडकर, अशोक उईके, पंकज भोयर, आशिष जयस्वाल, संजय कुटे यांच्यासह विविध लोकप्रतिनिधी उपस्थित होते. राहुल गांधी यांनी ‘अब लढाई संसद में नहीं, सड़कों पर होगी’, असे म्हटल्याचा संदर्भ देवेंद्र फडणवीस यांनी दिला. तुम्ही शंभर जण येणार असाल, तर आम्ही हजार जण येऊ, तुम्ही हजार जण येणार असाल, तर आम्ही लाखोंच्या संख्येने येऊ, असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.
त्यांच्या हातात लाल विचारांचे पुस्तक
राहुल गांधी यांच्या हातातील लाल रंगाच्या संविधानाच्या प्रतीवरूनही फडणवीस यांनी टीका केली. राहुल गांधी एका हातात संविधानाची प्रत दाखवतात; मात्र दुसऱ्या बाजूला कोणते विचार घेऊन फिरतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या मूलभूत विचारांशी हे विचार विसंगत असल्याचा आरोप त्यांनी केला.
बांगला देशी घुसखोरांना मतदानाचा अधिकार देणार नाही
मतदारयादीतील घुसखोरीचा मुद्दा उपस्थित करत फडणवीस यांनी बांगला देशी घुसखोरांचाही उल्लेख केला. भारताच्या मतदारयादीत घुसखोरांची नावे समाविष्ट असल्याचा आरोप करत, अशी नावे वगळण्याच्या प्रक्रियेला विरोधक विरोध करत असल्याचा दावा त्यांनी केला. देशात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या बांगला देशी नागरिकांना मतदानाचा अधिकार मिळता कामा नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.