धम्मचक्र प्रवर्तनदिन, अशोक विजयादशमीच्या तीन आठवड्यांपूर्वी दीक्षाभूमी येथील मुख्य स्टेजचे संपूर्ण बांधकाम करण्यात यावे, अशा आशयाचे निवेदन डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाठविले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. धम्मचक्र प्रवर्तन दिन, अशोक विजयादशमीला दीक्षा सोहळ्याचा वर्धापनदिन मोठ्या थाटात साजरा केला जातो. तीन दिवस हा कार्यक्रम चालतो. मुख्य सोहळ्यासाठी देश-विदेशातील पाहुणे येतात. त्यासाठी भव्य असा स्टेज तयार करण्यात येतो. दर वर्षाला नवीन स्टेज बांधावा लागतो. ही बाब लक्षात घेता राज्य शासनाने कायमस्वरूपी स्टेजचे बांधकाम निधी मंजूर केला आणि २०२३ पासून स्टेजच्या बांधकामाला सुरुवात झाली. स्टेजचे बांधकाम बर्यापैकी पूर्ण झाले असले तरी लोखंडी सळ्या मोकळ्या असून फिनिशिंग अद्याप झालेले नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिनाला 50 दिवस शिल्लक आहेत यावर भर दिला गेला. यासंदर्भात नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मीना यांच्याशी संपर्क साधला असता स्थगिती उठल्यास त्वरित कामाला सुरुवात करण्यात येईल, असे सांगितले.
दरम्यान, अंडरग्राऊंड पार्किंगसाठी तयार करण्यात आलेला खड्डा समतल करण्यात येत आहे. अर्ध्यापेक्षा अधिक काम पूर्ण झाले असून भदंत ससाई यांच्या उपस्थितीत कामाची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता संजय चिमूरकर, सहायक अभियंता पंकज पाटील, सुरक्षा अधिकारी सिद्धार्थ म्हैसकर उपस्थित होते.