

नागपूर : प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बंटी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस देण्यापूर्वी पक्षाच्या दारून पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून स्वतः राजीनामा द्यावा, पटोले यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेणाऱ्यांनी पक्षाचे काम न केल्याबद्दल स्वतः राजीनामे द्यावेत. अशी भूमिका काँग्रेसचे पराभूत उमेदवार बंटी शेळके यांच्या समर्थकांनी मध्य नागपूरातील पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
सोमवारी प्रेस क्लबमध्ये बंटी शेळके यांच्या विरोधात झालेल्या प्रेस कॉन्फरन्सला आज या माध्यमातून उत्तर देण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे संघ भाजपचे एजंट असल्याचा आरोप केल्यानंतर निलंबन कारवाईची टांगती तलवार असलेले बंटी शेळके मात्र यावेळी गैरहजर होते. यावेळी पदाधिकारी म्हणाले, काँग्रेसला एसीमधले, चमचे पदाधिकारी महत्वाचे वाटतात की निवडणूक च्या काळात दिवस रात्र एक करणारे कार्यकर्ता महत्वाचे वाटतात हा प्रश्न आहे. निवडणुकीत याच पदाधिकाऱ्यांनी काँग्रेसचे बंडखोर अपक्ष उमेदवार रमेश पुणेकर, मो.कलाम यांना समर्थन देत बंटी शेळके यांच्या मतांचे विभाजन केले. काँग्रेसचे दोन गट निर्माण केले. याचे ऑडिओ, व्हिडीओ पुरावे आमचे कडे आहेत जे आम्ही पक्षनेते राहुल गांधी यांना वेळप्रसंगी देणार आहोत. संपूर्ण निवडणूक प्रचारात हे पदाधिकारी गायब होते. यांनी बंटी शेळके यांना पराभूत करण्याचा कट रचला.
संघ मुख्यालयाचा अंतर्भाव असलेल्या मध्य नागपुरात काँग्रेसचा विचार भाजप- संघ परिवाराशी संघर्ष करीत लोकांपर्यंत पोहोचणाऱ्या बंटी शेळके यांच्या बाजूने आम्ही राहू असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष तौसीफ खान, महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अल्पसंख्यक विभाग इरफान काझी, बबनराव दुरुगकर, अश्रफ खान, सहदेव गोसावी, उषाताई खरबीकर, आकाश गुजर, नयन तलवारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.