

नागपूर : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप केल्याप्रकरणी काँग्रेसचे मध्य नागपुरातील उमेदवार बंटी शेळके यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. बंटी शेळके हे राहुल ब्रिगेडचे उमेदवार मानले जातात. स्वतः प्रियंका गांधी त्यांच्या मतदारसंघात रोड शो साठी आल्या होत्या. संघ मुख्यालयाजवळ असलेल्या बडकस चौक येथे या रोड शो चा समारोप वादळी झाला. भाजपचे कार्यकर्ते झेंडे घेऊन रस्त्यांवर आल्याने दोन्ही बाजूचे कार्यकर्ते परस्परासमोर उभे ठाकल्याने पोलिसांवर ताण वाढला होता. या पार्श्वभूमीवर आता बंटी शेळके यांच्यावर पक्ष निलंबन कारवाई करणार का हे पाहणे महत्वाचे आहे. यानिमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या विरोधातील विरोधाला धार चढणार असल्याचे दिसत आहे.
राज्याचे प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशानुसार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेवरून प्रदेश उपाध्यक्ष प्रशासन व संघटन नाना गावंडे यांनी बंटी शेळके यांना याविषयीचे पत्र दिले असून दोन दिवसात योग्य खुलासा न केल्यास आपणावर निलंबनाची कारवाई केली जाईल, असेही बजावले आहे.
काँग्रेस पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी आपल्याला उमेदवारी दिली मात्र आपला घात झाला. पक्षाचे चिन्ह असताना अपक्ष उमेदवारासारखी आपली अवस्था झाली. काँग्रेसचे संघटन माझ्या प्रचारात नव्हते, यामागे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेसचे मध्य नागपूरचे उमेदवार बंटी बाबा शेळके यांनी केला होता. बोटांवर मोजण्याइतकेच कार्यकर्ते माझ्यासोबत होते. नाना पटोले यांचे थेट संघाशी संबंध असल्याने त्यांनी इतरांशी भाजपची हात मिळवणी करून दिली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून काम करत असल्याने त्यांना पक्षातून त्या संघटनेतच पाठवा अशी आक्रमक भूमिका बंटी बाबा शेळके यांनी उपस्थित केल्याने काँग्रेसमध्ये पराभवानंतर घमासान सुरू झाले आहे.