

Congress Protest Nagpur
नागपूर: नागपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीतर्फे आज (दि.१०) महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाविरोधात गांधी पुतळा, व्हेरायटी चौक येथे अध्यक्ष, आमदार विकास ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.जनतेच्या हक्कांवर गदा आणणारे विधेयक असल्याचा आरोप करीत काँग्रेसने ठाम निषेध केला.
महाविकास आघाडी मित्रपक्ष नेते व कार्यकर्ते – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) व शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचीही उपस्थिती होती. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र जनसुरक्षा विधेयकाला “लोकशाही व संविधानावर घाला” ठरवत जोरदार घोषणाबाजी केली. विधेयक तात्काळ मागे घेण्याची मागणी आंदोलनातून एकमुखाने करण्यात आली.
"जनतेचे हक्क हिरावून घेणाऱ्या कोणत्याही कायद्याविरोधात काँग्रेस रस्त्यावर उतरेल”, असा इशारा देण्यात आला.आमदार विकास ठाकरे यांनी सांगितले की, हे विधेयक लोकशाही विरोधी व जनतेच्या हक्कांवर गदा आणणारे असून काँग्रेस कधीही असे धोरण सहन करणार नाही. जनतेचे हक्क आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत आणि हा लढा यापुढे अधिक तीव्र करू. आजचे आंदोलन ही फक्त सुरुवात असून काँग्रेस पक्ष राज्यभर या विधेयकाविरोधात तीव्र लढा उभारणार असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
या आंदोलनात माजी मंत्री, आमदार, माजी आमदार, प्रदेश पदाधिकारी, प्रदेश सेल प्रमुख, शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, सर्व ब्लॉक अध्यक्ष, माजी नगरसेवक, महापालिका इच्छुक उमेदवार तसेच महिला काँग्रेस, युवक काँग्रेस, सेवादल काँग्रेस, फ्रंटल संघटना व विविध सेलचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.