

Chandrashekhar Bawankule on Maha Vikas Aghadi
नागपूर: मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि ठाकरे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आल्यानंतर आता महाविकास आघाडीतून काँग्रेस बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. उद्धव ठाकरे यांनी नेहमीच काँग्रेसचा अपमान केला. पक्षाचे नुकसान केले, असा आरोप महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.
आता काँग्रेस पक्षाने विचार करायचा की , त्यांना किती अपमानित व्हायचं आहे. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. उद्धव ठाकरे यांच्यासोबत युती केल्यानंतर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे नुकसान झाले. खरे तर, उद्धव ठाकरे यांनी जिद्दीने काँग्रेस पक्षाच्या जागा घेऊन त्यांचे नुकसान केले आहे. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचा जो नाकर्तेपणा होता. तो काँग्रेसच्या अंगाशी आला आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना काँग्रेस पक्ष त्यावेळी सरकारमध्ये सहभागी होते. त्यामुळे त्यावेळचे मुख्यमंत्री काम करत नव्हते, विधानभवनात, मंत्रालयात येत नव्हते. उद्धव ठाकरे सरकारची अँटी इन्कम्बन्सी काँग्रेसवर आली. त्यामुळे त्यांचे नेते हतबल झाले होते. त्यामुळे आता स्थिती फार वाईट झाली असल्याचे बावनकुळे म्हणाले.
दरम्यान, गरीब लोकांची संख्या वाढत आहे आणि संपत्ती काही श्रीमंत लोकांच्या हातात केंद्रित होत असल्याबद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चिंता व्यक्त केली, यावर बावनकुळे म्हणाले, आर्थिक दुर्बल व्यक्तींपर्यंत सरकारच्या योजना , सरकारचा लाभ पोहचला पाहिजे. तो लाभ पोहचवण्यासाठी काही गोष्टी कमी पडत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली. ती योजना सर्व घरांपर्यंत पोहोचली पाहिजे यासाठी आम्हाला काम करण्याची गरज आहे. केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या सगळ्या योजना एखाद्या व्यक्तीपर्यंत पोहोचल्या की तो व्यक्ती बाहेर निघेल. त्यामुळे आम्ही यावर पक्ष म्हणूनही आणि सरकार म्हणूनही काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांची आजपासून सातबारा कोरा पदयात्रा पापळ या गावातून सुरू होत आहे. यावर बोलताना बावनकुळे म्हणाले. बच्चू कडू यांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी मी आणि आमच्या मंत्रिमंडळातील सहा खात्यांचे मंत्री साडेचार तास बसलो आणि एक एक प्रश्नावर आम्ही मार्ग काढला.त्यांना आम्ही लेखी आश्वासन ही दिले होते.
पावसामुळे नुकसान होईल अशी परिस्थिती महाराष्ट्रात नाही ,असे सांगून बावनकुळे म्हणाले, पिक पाण्यासाठी लागणारा योग्य असा पाऊस सध्या पडतो आहे. प्रत्येक मंत्रिमंडळ बैठकीत पहिले विषय हे पीक पाण्याची परिस्थिती काय आहे, जलसंपदा विभागाची परिस्थिती काय आहे, पावसामुळे काय नुकसान झाले आहे का ? यासंदर्भात असतात.