महाविकास आघाडीच्या नेत्यांनी विधानसभा निवडणूक गांभीर्याने घेतली आहे. शिवसेना नेते माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीत काँग्रेस नेत्यांच्या भेटीगाठीनंतर आता विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सज्ज झाली आहे. १० ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भात जिल्हानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत. प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री अमित देशमुख हे जिल्हानिहाय बैठका घेऊन काँग्रेस नेते पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत.
मराठवाड्यातील दौऱ्यात १० ऑगस्ट रोजी लातूर येथे लातूर, धाराशीव, बीड जिल्हा, दिनांक ११ ऑगस्ट रोजी नांदेड येथे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्हा तसेच दिनांक १२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे, छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्हा काँग्रेसची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार आहे. दरम्यान,दि १३ ऑगस्ट रोजी विदर्भात बुलढाणा येथे बुलढाणा, अकोला आणि वाशिमची, दिनांक १४ ऑगस्ट रोजी अमरावती येथे अमरावती, यवतमाळ जिल्हयाची बैठक घेऊन आढावा घेतला जाणार असल्याची माहिती प्रदेश उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे यांनी दिली.