

Nagpur Winter Session
नागपूर : एकट्या ऑक्टोबर महिन्यातील आकडेवारी देऊन निव्वळ गैरसमज निर्माण होतात. याशिवाय ही माहिती सुद्धा चुकीची आहे. अशी चुकीची माहिती का देण्यात आली, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे, त्यात दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (दि.११) स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री सहायता निधीतून ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर या काळात वितरित मदत 61 कोटी 51 लाख 698 रुपये इतकी आहे. मुख्यमंत्री सहायता निधीतून दैनंदिन पातळीवर खर्च होतो. त्यामुळे दररोज या खर्चाची रक्कम ही वाढत असते. त्यामुळे फक्त एका महिन्याची माहिती सांगून निष्कर्ष काढणे चुकीचे ठरेल.
याशिवाय शेतकऱ्यांना केवळ मुख्यमंत्री सहायता निधीतूनच मदत दिली जाते, असे नाही, तर मदत आणि पुनर्वसन विभागासह विविध खात्याकडून सुद्धा दिली जाते. आतापर्यंत विशेष पॅकेजमधून 14,000 कोटींपेक्षा अधिकची रक्कम प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेली आहे आणि अजूनही ही प्रक्रिया सुरूच असल्याने त्यातही सातत्याने वाढ होत असते, याकडेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लक्ष वेधले आहे.