

Devendra Fadnavis on Diabetes Health
नागपूर : पारंपरिक जीवनशैलीतून विकसित झालेल्या आहारविषयक सवयींमध्ये शहरीकरणामुळे अनुचित बदल झाले आहेत. त्याचा दुष्परिणाम म्हणून कमी वयात विविध आजार बळावत आहेत. आदर्श जीवनशैलीचा स्वीकार करून मधुमेहापासून दूर राहता येणे शक्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
डायबिटीज केअर अँड रिसर्च सेंटर व डायबिटीज केअर फाउंडेशन ऑफ इंडियाच्या संयुक्त विद्यमाने 'हॅलो डायबिटीज' या 12 व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन हॉटेल सेंटर पॉइंट येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सुनील गुप्ता, डॉ. रती मकर, पद्मश्री डॉ. शशांक जोशी, पद्मश्री डॉ. कमलाकर त्रिपाठी, डॉ. ए.के. दास, डॉ. बन्शी साबू, डॉ. विंकी रुघवानी, डॉ.कविता गुप्ता, चिकित्सक, तज्ज्ञ व वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यासक यावेळी उपस्थित होते.
भारतात मोठ्या प्रमाणात पसरत जाणारा मधुमेह आणि ओबेसिटी ही गंभीर व चिंतेची बाब असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, भारत ही मधुमेहाची राजधानी होऊ नये यासाठी आयोजित करण्यात येणाऱ्या अशा जनजागृतीपर परिषदांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
मधुमेह या आजारावर अधिक सखोल संशोधन होणे ही काळाची गरज असल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, या परिषदेच्या माध्यमातून मधुमेह जडण्याची कारणे, उपाय व आदर्श जीवनशैली या विषयांवर जनजागृती होणे गरजेचे आहे. मनुष्याच्या शारीरिक क्षमता क्षीण करणाऱ्या या आजारावर जनजागृती हाच प्रथम व प्रभावी उपचार आहे. गरोदर स्त्रियांना व त्यातून पुढे नवजात बालकांना होणारा मधुमेह रोखण्याचे आव्हान तज्ज्ञांसमोर आहे. या परिषदेच्या माध्यमातून सकारात्मक निष्कर्ष प्राप्त झाल्यास येणारी पिढी निश्चितच मधुमेहमुक्त राहील, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
डायबिटीस हा आजार झालेला असतानाही तो न स्वीकारण्याची मानसिकता असणे ही आपल्या येथील सर्वात मोठी समस्या आहे. यासाठी या आजाराची भीती न बाळगता औषधोपचार करण्यासोबतच जीवनशैलीत सुधार आणण्याबाबत योग्य मार्गदर्शन या परिषदांमधून होणे अपेक्षित असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
या परिषदेत मधुमेहाची कारणे, उपाय व आदर्श जीवनशैली या विषयांवर चर्चा होणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामांकित मधुमेह तज्ज्ञ या परिषदेत सहभागी झाले असल्याचे त्यांनी सांगितले. तीन दिवस चालणाऱ्या या परिषदेत मधुमेहाशी संबंधित सादरीकरण होणार असून विविध कार्यशाळांचे आयोजन करण्यात आले आहे. डॉ. सुनील गुप्ता यांनी प्रास्ताविक केले.