

Nagpur Rain
नागपूर : नागपूर शहर आणि जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुधवारी नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांकडून आढावा घेतला. गेले दोन दिवस नागपुरात संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे सखल वस्त्यांमध्ये पाणी साचले आहे.
सध्या येथील परिस्थिती नियंत्रणात आहे. तथापि कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफ चमू सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. मुसळधार पावसाचा इशारा लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने आज जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी सुद्धा सुरक्षेची काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
नागपूर जिल्ह्यात पावसाने हाहाकार उडाला आहे. गेल्या २७ तासांत नागपूर शहरात तब्बल १३६.९ मिलिमीटर पाऊस पडला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाने नागपूरला 'येलो अलर्ट' दिला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात आली आहे.