

Chimur Bhisi Accident
नागपूर : चिमूर तालुक्यातील भिसी परिसरात रविवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात नागपूर येथील एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण गंभीर जखमी झाली आहे. भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे कार चालवणाऱ्या अज्ञात चालकाने दोन दुचाकींना जोरदार धडक देऊन घटनास्थळावरून पलायन केले. या प्रकरणी भिसी पोलिसांनी गुन्हा दाखल करून फरार चालकाचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर येथील महाविद्यालयात शिक्षण घेणारे सहा मित्र-मैत्रिणी रविवारी सकाळी चिमूर तालुक्यातील मुक्ताई धबधबा पाहण्यासाठी दोन दुचाकींवरून निघाले होते. या गटात मैथिली संतोष सावंत (१९), मोहित दिनेश घटारे (१९), ध्वनी गजानन कामळे (२०), खुशी हरिदास इंगळे (१९), रिया राज देवागीरकर (२२) आणि ट्विंकल किशोर चिकाटे (२२) यांचा समावेश होता.
धबधबा पाहून परत येत असताना दुपारी साडेअकरा ते बाराच्या सुमारास चिमूर मार्गावरील टाकाफाटा परिसरात सर्वजण पाणी पिण्यासाठी रस्त्याच्या कडेला दुचाकी उभ्या करत होते. त्याचवेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या ग्रे रंगाच्या अज्ञात कारने दोन्ही दुचाकींना जोरदार धडक दिली. धडकेचा जोर इतका होता की रिया देवागीरकर गंभीर जखमी होऊन रस्त्याच्या कडेला फेकली गेली, तर मैथिली सावंत शेजारील शेतात जाऊन पडली.
अपघातात रियाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, तर मैथिलीच्या डोक्याला, हाताला आणि पायाला जबर मार लागला. धडक दिल्यानंतर कारचालकाने वाहन न थांबवता घटनास्थळावरून पलायन केले. घटनेनंतर मित्रमैत्रिणींनी तातडीने १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधला. जखमींना प्रथम उपचारासाठी घटनास्थळावरून नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले.
मात्र, उपचार सुरू असताना दुपारी सुमारे चार वाजण्याच्या सुमारास डॉक्टरांनी रिया राज देवागीरकर हिला मृत घोषित केले. गंभीर जखमी झालेल्या मैथिली सावंत हिला पुढील उपचारासाठी धंतोली येथील शंकरा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात हलविण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेप्रकरणी जखमी मैथिलीची मावशी स्नेहलता वनमाळी सामल (रा. नागपूर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून भिसी पोलिस ठाण्यात अज्ञात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.