

पुढारी ऑनलाईन डेस्क : Maharashtra Assembly Winter Session | राज्यातील जनतेने बिनधास्त रहावे, कारण जी आश्वासने आम्ही दिली आहेत. ज्या योजना आम्ही सुरू केल्या आहेत. त्यातील एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही. विधानसभा निवडणुकीत जी योजना किंगमेकर ठरली ती 'मुख्यमंत्री लाडकी बहीण' योजना कायम ठेवणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी आज विधानसभेत बोलताना दिले. विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज (दि.१९) चौथा दिवस आहे.
"मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील १४ कोटी जनतेचे आभार मानतो की, त्यांनी महायुतीला घवघवीत यश देत निवडून दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या 'एक हैं तो, सेफ हैं' या नाऱ्याला महाराष्ट्राने मोठा प्रतिसाद दिला. यातून मोठा विजय महाराष्ट्राला प्राप्त झाला आहे. महायुती काळात सुरू झालेल्या सर्व योजना कायम राबविल्या जातील", असे आश्वासन देखील देवेंद्र फडणवीस यांनी दिले
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ज्या लाडक्या बहिणींनी (Ladki Bahin Yojana) महायुतीवर प्रेम दाखवलं. त्यांच्यासाठी हे अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आम्ही डिसेंबरचा हप्ता जमा करणार आहे. राज्यपालांच्या अभिभाषणावर विधानसभेत झालेल्या चर्चेला उत्तर देताना आज त्यांनी ही माहिती दिली. तत्पूर्वी हिवाळी अधिवेशनाचे कामकाज शनिवार, दि. २१ डिसेंबर २०२४ रोजी पर्यंत चालणार असल्याची माहिती 'माहिती मंत्री' चंद्रकांत पाटील यांनी निवेदनाद्वारे दिली आहे.
"आज मी त्यांचे मनापासून आभार मानतो. ज्यांनी मला वारंवार टार्गेट केले. त्यामुळेच महाराष्ट्रातील जनतेमध्ये माझ्याबद्दल सहानभुती दाखवली आणि महायुतीला ऐतिहासिक यश दिले. तसेच मागील ५ वर्षात मी जे काही काम केलं होतं, ते जनतेने पाहिले होते. त्यामुळेच आम्हाला मोठा विजय मिळाल्याचे" मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
माझ्या कुटुंबावर आणि विरोधकांनी टीका करण्याचे काम विरोधकांनी निवडणुकीपूर्वी केले. पण मी त्यांना सांगू इच्छितो की, "मी आधुनिक अभिमन्यू आहे. चक्रव्यूह मला भेदता येते. त्यांनी माझ्या चारी बाजुला चक्रव्यूह निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. पण मी चक्रव्यूह भेदले. याचे श्रेय मी माझ्या पक्षाला, सहकाऱ्यांना आणि जनतेला देतो", असे देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना सांगितले.