नागपूर : ग्रॅंडमास्टर दिव्या देशमुख हिच्या निवासस्थानी जाऊन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी शनिवारी नागपूर दौऱ्यात आवर्जून तिचे मनःपूर्वक अभिनंदन केले. यावेळी बोलताना सरन्यायाधीशांनी देशमुख आणि गवई कुटुंबीयांमधील जुन्या आठवणींना उजाळा दिला.
दिवंगत डॉ. के. जी. देशमुख हे अमरावतीच्या संत गाडगेबाबा विद्यापीठाचे कुलगुरू म्हणून कार्यरत होते. विद्वत्ता, अभ्यासू वृत्ती आणि व्यापक दृष्टीकोन यासाठी त्यांची ख्याती संपूर्ण शैक्षणिक क्षेत्रात होती. डॉ. देशमुख आणि दादासाहेब गवई यांच्यात दीर्घकाळापासून दृढ आणि आत्मीयतेचे संबंध होते. देशमुख कुटुंब मूळचे अमरावतीचे असल्याने आमच्या कुटुंबाचाही त्यांच्या कुटुंबाशी विशेष जिव्हाळा आहे याचा उल्लेख केला.
दिव्याने मिळवलेले यश केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नाही, तर संपूर्ण देशासाठी अभिमानास्पद आणि अत्यंत महत्त्वाचे आहे. तिच्या कामगिरीतून अनेकांना नवी प्रेरणा मिळून, नव्या उंची गाठण्याची उमेद निर्माण होईल, असे सरन्यायाधीश भूषण गवई यावेळी म्हणाले.