

नागपूर - महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सोमवारी दुपारी अचानक खामला परिसरातील दुय्यम निबंधक कार्यालयात धडक दिली. यावेळी एका अधिकाऱ्याच्या टेबलवरील ड्राव्हरमध्ये काही पैसे आढळून आल्यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना पाचारण केल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ माजली.
हे पैसे व्यक्तिगत की रजिस्ट्री संदर्भात संबंधितांकडून घेतलेले आहेत याविषयीची चौकशी पोलीस करतील आणि सरकार पुढची कारवाई करेल असे त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केले. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्याला काही तक्रारी प्राप्त झाल्या. तीस लाखांच्या वर रकमेचे व्यवहार करताना आयकर विभागाला माहिती देणे बंधनकारक असताना ती दिली जात नाही. या सोबतच प्रत्येक रजिस्ट्रीमागे पाच ते आठ हजार रुपये घेतले जातात.
मुळात सर्व व्यवहार राज्य सरकारने ऑनलाईन केलेला असताना पैशाचा व्यवहार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नेमलेले एजंट मार्फत केला जात असल्याच्या या तक्रारींची शहानिशा करण्यासाठीच आपण आज या कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. राज्यात कुठेही अशा प्रकारचा व्यवहार होत असल्यास आपल्या व्हाट्सअपवर थेट संपर्क साधावा, तक्रार करावी असे आवाहन या निमित्ताने महसूलमंत्री बावनकुळे यांनी केले आहे. अर्थातच यावेळी सापडलेले पैसे संबंधित अधिकाऱ्यांचे व्यक्तिगत की गैरमार्गाने आलेले आहेत याविषयीचे गूढ मात्र या धाडसत्रानंतर कायम आहे.