

Mumbai bomb threat
मुंबई : मुंबईत उद्या गणपती विसर्जनाची जोरदार तयारी सुरू असतानाच पोलिसांना धमकीचा संदेश आल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील ३४ वाहनांमध्ये 'ह्युमन बॉम्ब' ठेवण्यात आले आहेत आणि या स्फोटामुळे संपूर्ण मुंबई हादरून जाईल, अशी धमकी या संदेशात देण्यात आली आहे. 'लष्कर-ए-जिहादी' नावाच्या एका संघटनेने हा संदेश पाठवल्याचे सांगितले आहे. (Mumbai News)
पोलिसांच्या वाहतूक शाखेला व्हॉट्सॲपवर आलेल्या धमकीच्या संदेशानुसार, मुंबईमध्ये ३४ वेगवेगळ्या गाड्यांमध्ये 'ह्युमन बॉम्ब' पेरण्यात आले आहेत. यामध्ये १४ पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसले असून, हे बॉम्बस्फोट घडवून आणणार आहेत, असेही म्हटले आहे. या स्फोटांसाठी ४०० किलो RDX चा वापर केला जाईल, असा दावाही या संदेशात करण्यात आला आहे.
हा धमकीचा संदेश मिळाल्यानंतर मुंबई पोलीस तात्काळ सतर्क झाले आहेत. मुंबईसह संपूर्ण राज्यात सुरक्षा वाढवण्यात आली आहे. धमकीच्या या संदेशाची मुंबई पोलीस गंभीर दखल घेत असून, सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. या धमकीच्या संदेशामागील सत्यता तपासण्याचे काम सुरू आहे. (Mumbai News)