

Chandrashekhar Bawankule On Separate Vidarbha: राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषदेत वेगळा विदर्भ हा मुद्दा भाजपचा आहे. काँग्रेसचा कधीच मुद्दा नव्हता आता त्यांच्याकडे मुद्दे नाहीत म्हणून त्यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा काढला असे वक्तव्य केलं.
त्यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते संजय राऊत यांनी 'वेगळ्या विदर्भा'च्या मुद्द्यावरून भाजप आणि विशेषतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'महाराष्ट्र तोडण्याचा भाजपचा अजेंडा आहे' असे म्हणत राऊत यांनी सत्ताधारी गटाचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानाचा आधार घेत थेट हल्लाबोल केला.
नागपुरात पत्रकारांशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले होते की, 'घाबरलेले काँग्रेसचे नेते काहीतरी मुद्दा काढत आहेत. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा जो त्यांचा अजेंडवर कधीच नव्हता पण घाबरून आता जनतेसमोर कुठला मुद्दा घेऊन जावा म्हणून आता वेगळा विदर्भाचा मुद्दा काँग्रेस पार्टी काढताय. पण हा मुद्दा भाजपाचा आहे. हा मुद्दा आमच्या अजेंड्याचा आहे. या मुद्द्यावर आम्ही काम करतो आहे. हा मुद्दा भाजपच्या अजेंड्यातून बाहेर गेला नाही. आम्ही या ठिकाणी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच पहिल्यापासन काम करतोय.'
बावनकुळे देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत देखील म्हणाले की, माननीय मुख्यमंत्री सुद्धा वेगळ्या विदर्भाच्या बाजूनेच आहेत. त्यांनी आतापर्यंत आपली हीच भूमिका ठेवली आहे.'
दरम्यान, भाजपच्या मंत्र्याच्या वेगळ्या विदर्भच्या मागणीला पाठिंबा दर्शवणाऱ्या वक्तव्याचा संजय राऊत यांनी समाचार घेतला. विदर्भ तोडण्याच्या भाजपच्या भूमिकेवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील आमदारांनी मौन बाळगल्याबद्दल राऊत यांनी टीका केली.
ते शिंदे गटाला शहांचे मिंदे म्हणत, 'तुमच्या कॅबिनेटमधला एक मंत्री महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतो आहे आणि तुम्ही स्वतःला शिवसेना म्हणवणारे बर्फाच्या लादीवर बसल्यासारखे थंडगार गोळा होऊन बसला आहात. याचा अर्थ तुम्ही अमित शहाच्या दबावाखाली आहात आणि अमित शहाचा जो मुंबई आणि विदर्भ तोडण्याचा अजेंडा आहे, त्याला तुम्ही छुपा पाठिंबा देत आहात, हे स्पष्ट होतेय.'