

नागपूर: राज्यातील काही नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या निवडणुका मतदानाच्या एक दिवस आधीच पुढे ढकलण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला. आयोगाच्या या भूमिकेशी राज्य शासन असहमत असल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
निवडणुका पुढे ढकलू नयेत म्हणून शासनाने आयोगाशी चार वेळा पत्रव्यवहार केला होता. मात्र, नाना पटोले निवडणूक आयोगाच्या घोळासाठी शासनाला जबाबदार धरत आहेत. त्यांना प्रत्येक गोष्टीत राजकारणच दिसते, अशी टीका त्यांनी केली. आमच्या प्रदेशाध्यक्षांनी दिलेला २ तारखेचा अल्टीमेटम हा फक्त स्थानिक निवडणुकांच्या संदर्भात होता. राज्यातील महायुतीबाबत नव्हता, असेही त्यांनी नमूद केले.
निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सर्वच पक्षांचे नेते नाराजी व्यक्त करत आहेत. आयोगाने निवडणुका पुढे ढकलू नयेत, ही आमची ठाम भूमिका आहे. आम्ही सरकार म्हणून आमचे धोरण स्पष्ट केले.
आयोगाची भूमिका चुकीची असल्याचेही त्यांनी सांगितले.
अतिवृष्टीग्रस्तांना केंद्राकडून मदत मिळण्याबाबत ते म्हणाले की, केंद्र सरकारचे पथक नुकसानीची पाहणी करून गेले आहे. राज्य सरकार प्रस्ताव पाठवते आणि केंद्र सरकार त्याचा अंतिम निर्णय करते. त्यानंतर अंतिम गोषवारा तयार होतो. हा गोषवारा लवकरच अंतिम होईल आणि राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मोठी मदत मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान,कामठी नगरपरिषदेची निवडणूक रद्द करण्याच्या मागणीबाबत बावनकुळे म्हणाले की, न्यायालयात याचिका दाखल करणे हा प्रत्येक नागरिकाचा अधिकार आहे. न्यायालयच यावर अंतिम निर्णय देईल स्थानिक निवडणुकीत काही ठिकाणी महायुतीमध्ये नाराजीची प्रकरणे झाली असली तरी त्याचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही असा दावा केला.