

नागपूर : गेले अनेक दिवस चर्चेत असलेली ब्रिक्स परिवहन परिषदेंतर्गत 11 देशांतील परिवहनमंत्र्यांची बैठक आज, शनिवारी हॉटेल रॅडिसन ब्लू येथे होणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखालील या बैठकीत ब्राझील, रशिया, चीन, दक्षिण आफ्रिका, इजिप्त, इथिओपिया, इराण, यूएई, इंडोनेशिया, सौदी अरेबिया या देशांचे परिवहनमंत्री आणि उच्चस्तरीय अधिकारी सहभागी होणार आहेत. भारत आणि ब्रिक्स देशांमधील पायाभूत सुविधा, पर्यावरणपूरक वाहतूक आणि शाश्वत ऊर्जा या क्षेत्रांतील द्विपक्षीय व बहुपक्षीय सहकार्याला यातून पाठबळ दिले जाणार आहे. विदेशी पाहुणे आणि ब्रिक्स परिषदेसाठी शहरात वेगळी तयारी करण्यात आली आहे.
सुविधांमधील शाश्वतता, शाश्वत विमान इंधन, वाहतुकीचे शहरी डीकार्बोनायझेशन, गतिशीलता, लवचिक लॉजिस्टिक्स, रेल्वे संशोधन सहकार्य या सहा मुख्य क्षेत्रांवर यावेळी धोरणात्मक चर्चा होणार आहे. ब्रिक्स देशांची न्यू डेव्हलपमेंट बैंक भारतात अक्षय ऊर्जा, जलसंधारण आणि पर्यावरणपूरक गृहनिर्माण प्रकल्पांना मोठ्या प्रमाणावर निधी पुरवत आहे. याशिवाय, बांधकाम क्षेत्रात कमी कार्बन उत्सर्जन करणाऱ्या सिमेंट आणि इतर साहित्याचा वापर वाढवण्यासाठी ब्रिक्स देशांमध्ये तांत्रिक देवाणघेवाण होणार आहे.
मुंबई, दिल्ली आणि भोपाळसारख्या मेट्रो प्रकल्पांना एनडीबीचे आर्थिक साहाय्य मिळाल्याने आता शहरांमधील वाहतूक कोंडी सोडविणे आणि सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी ब्रिक्स देशांमधील स्मार्ट सिटी मॉडेल्स आणि प्रगत ट्राफिक व्यवस्थापन प्रणालीवर मंथन होईल. भारताच्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय योजनेच्या धर्तीवर, ब्रिक्स देशांतर्गत व्यापार सुलभ करण्यासाठी आधुनिक लॉजिस्टिक्स नेटवर्क तयार केले जात आहे. सागरी व्यापारी मार्गामधील अडथळे दूर करणे आणि डिजिटल कस्टम्स प्रक्रियेद्वारे वाहतुकीचा खर्च व वेळ वाचवण्यावर यात भर दिला जाईल. ब्रिक्स रेल्वे संशोधन नेटवर्क अंतर्गत हाय-स्पीड रेल्वे आणि रेल्वेच्या संपूर्ण विद्युतीकरणावर संशोधन सुरू आहे. रेल्वे सुरक्षेसाठी भारताची स्वदेशी 'कवच' प्रणाली आणि रशियाचे प्रगत सिग्नलिंग तंत्रज्ञान, तसेच जास्त वजनाच्या मालवाहतुकीसाठी कॉरिडॉरचा विकास यावर चर्चा होणार आहे.
ई-वाहन क्षेत्रातील दोन मोठे उत्पादक भारत आणि चीन है बैटरी तंत्रज्ञान आणि चार्जिग इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी एकत्र काम करत आहे. पेट्रोल-डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी भारताच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ग्लोबल वायोफ्युअल्स अलायनामध्ये ब्रिक्स देश महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. नागपुरातील ही बैठक केवळ आर्थिक विकासापुरती मयादित नसून भारताची तंत्रज्ञान क्षमता आणि इतर ब्रिक्स देशांचे संसाधन व्यवस्थापन यांच्या एकत्रिकरणातून भविष्यातील पर्यावरणपूरक आणि प्रदूषणमुक्त वाहतुकीचे उद्दीष्ट्य गाठण्यास महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे. जैवइंधन उत्पादनासाठी सहकार्य तंत्रज्ञानात आघाडीवर असलेल्या ब्राझीलच्या मदतीने भारतात इथेनॉल आणि कृषी कचऱ्यापासून शाश्वत विमान इंधन बनवण्याचे करार झाले आहेत. विमानांमध्ये शाश्वत विमान मिश्रण करण्याचे भारताचे लक्ष्य आहे.