

Breath Diabetes Test
नागपूर: मधुमेहाच्या रुग्णांना आता रक्ताच्या चाचणीसाठी वारंवार सुई टोचून घेण्याच्या वेदना सहन कराव्या लागणार नाहीत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागाने एका अशा उपकरणाचा शोध लावला आहे, ज्यामुळे केवळ श्वासावाटे मधुमेहाची अचूक तपासणी करणे शक्य होणार आहे. या 'नॉन-इनवेसिव्ह डायबिटीस मॉनिटरिंग डिव्हाइस'ला नुकतेच युके (UK) डिझाइनचे नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे.
मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठी रुग्णांना दिवसातून अनेकदा रक्तातील शर्करेची पातळी तपासावी लागते. सध्याच्या पद्धतीत सुईद्वारे रक्ताचा थेंब काढून त्याची चाचणी केली जाते. ही प्रक्रिया वेदनादायी असल्याने अनेक रुग्ण टाळाटाळ करतात. मात्र, नागपूर विद्यापीठाच्या संशोधकांनी विकसित केलेले हे नवीन उपकरण पूर्णपणे 'नॉन-इनवेसिव्ह' आहे. म्हणजेच, शरीरात कोणतीही सुई न टोचता केवळ श्वासातील घटकांचे विश्लेषण करून हे यंत्र मधुमेहाचे प्रमाण मोजू शकते.
सुईचा वापर टाळल्यामुळे रुग्णांना कोणताही त्रास होत नाही.
श्वासातील विशिष्ट वायूंच्या आधारे रक्तातील साखरेचे प्रमाण मोजण्याचे तंत्र यात वापरले आहे.
या ‘नॉन-इनवेसिव्ह डायबिटीस मॉनिटरिंग डिवाइस’ला युके डिझाईन नोंदणी प्रमाणपत्र मिळाल्याने या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.
नियमित चाचणी करावी लागणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी आणि लहान मुलांसाठी हे उपकरण महत्वाचे ठरणार आहे.