

Brahmos engineer spying case
नागपूर : हनी ट्रॅप मध्ये अडकून फेसबुकच्या माध्यमातून देशाविषयीची संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरविणाऱ्या निशांत अग्रवालला तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी (दि.१) सुनावली आहे. तीन वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर निशांत अग्रवाल यांची सुटका होण्याची शक्यता आहे.
सत्र न्यायालयाने ठोठावलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेला निशांत यांने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. न्यायमूर्ती अनिल किलोर आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला. 2018 मध्ये नागपूरच्या मोहगाव येथील ब्रह्मोस प्रकल्पातील माहिती पाकिस्तानला दिल्याचा आरोप निशांत अग्रवाल यांच्यावर होता.
8 ऑक्टोबर 2018 रोजी यूपी आणि महाराष्ट्र एटीएसने संयुक्त कारवाई करून नागपूरच्या उज्वल नगर परिसरातील त्यांच्या घरावर छापा टाकत त्यांना अटक केली होती. शासकीय गोपनीयतेच्या कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. ते नागपूरमधील ब्रह्मोस मिसाइल निर्मितीशी संबंधित कंपनीत वैज्ञानिक म्हणून कार्यरत होते.
दरम्यान, कार्यालयातील संगणकातील अत्यंत गोपनीय माहिती त्यांनी त्यांच्या घरातील संगणकात ठेवली होती. ही माहिती शत्रूराष्ट्राला पुरवल्याचा संशय एटीएसला होता. त्याच आधारावर 8 ऑक्टोबर 2018 रोजी संयुक्त कारवाईत त्यांना अटक करण्यात आली. आज त्याच प्रकरणात उच्च न्यायालयाने त्यांना दोषी धरत सुधारित शिक्षा जाहीर केली.
नागपूरच्या उज्वल नगर भागात निशांत अग्रवाल हे किरायाने राहत होते. ते ब्रह्मोस मिसाइलच्या निर्मितीशी संबंधित कंपनीत सीनियर सिस्टिम इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. हनी ट्रॅपमध्ये फसून त्यांनी हेरगिरी केल्याचा संशय यूपी आणि महाराष्ट्र एटीएसला होता. कार्यालयातील गोपनीय माहिती घरातील संगणकात साठवून ती शत्रूपक्षाला पुरवल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला होता.
ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्टचा भंग केल्यामुळे सत्र न्यायालयाने निशांत अग्रवाल याला तीन वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यासोबतच आयटी ॲक्टनुसार जन्मठेपेची शिक्षाही सत्र न्यायालयाने ठोठावली होती. फेसबुकवरील काही महिलांच्या संपर्कात येऊन निशांत अग्रवाल याने काही सॅाफ्टवेअर आपल्या लॅपटॉपवर डाऊनलोड केले आणि तेच दस्तऐवज फेसबुक अकाऊंटवर शेअर केले अशी माहिती अतिरिक्त सरकारी वकील संजय डोईफोडे यांनी दिली.