

नागपूर : महायुतीचे काम विधानसभा निवडणुकीत सर्वांनी इमानदारीने काम केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल, धर्मरावबाबा आत्राम त्यांच्या मेळाव्यात काय बोलले मला माहिती नाही. पण धर्मरावबाबाना निवडून आणण्यासाठी मी स्वतः दोन बैठका घेतल्या. त्यामुळे कुणी काम केले?, कुणी काम केले नाही? असे बोलण्याचे दिवस आता नाहीत. तर आपल्या सरकारकडून असलेल्या लोकांच्या अपेक्षा पूर्ण करायच्या आहेत. ही टीका टिप्पणी करण्याची वेळ नाही, असा सबुरीचा सल्ला महसूल मंत्री, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.
मला महायुतीकडून मंत्रीपदाची अपेक्षाच नाही. महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण ४० जागांसाठी भाजपला भीक मागायची का? मी कुणाशीही तडजोड करणार नाही. कारण एकीकडे विधानसभेच्या निवडणुकीत आमच्या विरोधात उमेदवार उभे करता, त्यांना आर्थिक मदत करत त्या उमेदवाराला पाठबळ देता, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) नेते धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजपवर शुक्रवारी विभागीय मेळाव्यात केली. यासंदर्भात बावनकुळे बोलत होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागल्यावर आम्ही एकत्र बसणार आहोत, असेही ते म्हणाले.
लाडक्या बहीणींसाठी दुसऱ्या विभागांचा निधी वळवल्याचा आरोप सरकारवर होत आहे. यासंदर्भात विचारले असता, मला हे समजत नाही की, अशा बातम्या कोण पेरतात? संभ्रम निर्माण करतात. लाडक्या बहीणींचे हेड वेगळे आहे. सामाजिक न्याय विभागाचे आणि आदिवासी समाजाच्या निधीचे हेड वेगळे आहेत. त्यामुळे निधी इकडचा तिकडे करता येत नाही. हा चक्क खोटारडेपणा आहे. सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, असेही बावनकुळे म्हणाले.