

Maoist links in organizations
नागपूर: नुकत्याच विधिमंडळात पारित झालेल्या जनसुरक्षा विधेयकावरून विरोधकांनी महायुती सरकारला लक्ष्य केले असताना भाजपने थेट पलटवार केला आहे. वर्धा जिल्ह्यातील गांधीवादी संस्थांमध्ये आणि महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठात माओवादी विचारसरणीच्या लोकांचा शिरकाव झाला आहे, असा आरोप भाजप आमदार सुमित वानखेडे यांनी केला आहे.
ते पुढे म्हणाले की, महात्मा गांधींच्या विचारसरणीवर चालणाऱ्या या संस्थांमधून माओवादी विचार पसरवले जात जात आहेत. अशा कारवायांना आळा घालण्यासाठीच महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायदा राज्यात लागू करण्यात येत असून तो फायदेशीर ठरणार आहे.
महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा कायद्याच्या अंमलबजावणीनंतर अशा माओवादी विचारसरणीच्या संस्थांवर कारवाई करणे शक्य होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेस पक्षाने शहरी नक्षलवाद पसरवणाऱ्या माओवादी विचारांच्या लोकांची मदत घेतल्याचा आरोपही वानखेडे यांनी यावेळी केला.