

नागपूर - आगामी बिडगाव व बहादूरा नगरपंचायत निवडणुका शांततापूर्ण पार पडाव्यात यासाठी वाठोडा पोलीस ठाणे हद्दीत आज शनिवारी पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक पाच निकेतन कदम यांचे नेतृत्वात परिमंडळ क्रमांक पाच मधील सर्व पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार यांनी दंगल नियंत्रण प्रात्यक्षिक जिजामाता नगर येथील मोकळ्या मैदानामध्ये केले.
यावेळी पोलिसांनी अश्रुधूर (Tear Gas) वापर, जमावनियंत्रण तंत्रे, आपत्कालीन प्रतिसाद पथकांची हालचाल आणि प्रत्यक्ष परिस्थिती हाताळण्याची कौशल्यपूर्ण कार्यपद्धती यांचे प्रदर्शन करून पोलिसांनी निवडणुकीसाठी आवश्यक असलेली सज्जता जनतेसमोर सादर केली.
वाठोडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी हरीश कुमार बोराडे, तसेच पारडी, कळमना आणि यशोधरा नगर येथील पोलीस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि सर्व सहाय्यक पोलीस निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक असे सुमारे 25 अधिकारी व ७० अंमलदार उपस्थित होते.
यावेळी विविध सुरक्षा उपकरणांचा वापर, जलद हालचाल, परिस्थितीनुरूप धोरणात्मक बदल आणि नागरिक व मतदान केंद्रांच्या सुरक्षेचा आराखडा याचे प्रत्यक्ष प्रदर्शन करण्यात आले.
या उपक्रमामुळे निवडणुकीदरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवल्यास पोलिस दल तातडीने व प्रभावीपणे परिस्थिती हाताळू शकते, असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचला. आगामी निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पडावी, यासाठी पोलिसांची तयारी भक्कम असल्यावर भर दिला गेला.