

नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोमवारी (दि.२) रात्री बेंगळुरूसाठी उड्डाण भरणारे एयर इंडिया एक्सप्रेसचे फ्लाइट क्रमांक (आय एक्स १३७९) हे विमान ऐनवेळी रद्द करण्यात आले. विमानातील केबिन प्रेशरायझेशन सिस्टीममध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून हे उड्डाण रोखण्यात आले. मात्र, उड्डाण रद्द झाल्याची माहिती नाही. पर्यायी व्यवस्थेबाबत स्पष्टता नसल्याने संतप्त प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला.
नियोजित प्रवासासाठी सर्व प्रवासी सुरक्षा तपासणी पूर्ण करून बोर्डिंग गेटजवळ विमानाची वाट पाहत होते. त्याचवेळी अचानक विमान रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली. विमानात तांत्रिक बिघाड असल्याने प्रवाशांचा जीव धोक्यात न घालता उड्डाण रद्द करत असल्याचे सांगितले गेले. मात्र, एअरलाइन प्रशासनामार्फत उड्डाण रद्द झाल्यानंतर प्रवाशांना दुसऱ्या विमानाने पाठवले जाणार की नाही, याबाबत कर्मचाऱ्यांनी कोणतीही स्पष्ट माहिती दिली नाही. अनेक तास ताटकळत ठेवल्यामुळे प्रवाशांचा संयम सुटला. कर्मचाऱ्यांना घेराव घालत जाब विचारला. अखेर प्रशासनाकडून प्रवाशांना तिकीट भाडे परत करण्यात आले.