नागपूर ः एकत्रित शिवसेनेने कधीकाळी चार जागांसाठी भाजपसोबत युती तोडली होती. मात्र, आता शरद पवार आणि काँग्रेसने महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरे यांची फसवणूक केली असल्याचा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना केला आहे. ते गुरुवारी नागपूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
रामटेक मतदारसंघातून ठाकरे गटाच्या उमेदवाराची अनामत जप्त करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक लढत असून रामटेकमध्ये उद्धव ठाकरेंचा ठरवून अपमान केला जात आहे. मविआतील काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष बंडखोरी करीत असताना त्याबद्दल नाना पटोले यांनी पाळलेले मौन आश्चर्यजनक आहे. मुख्यमंत्रिपदाच्या लोभापायी उद्धव ठाकरेंनी हिदुत्वाचा विचारही सोडला, असे बावनकुळे म्हणाले.
मनोज जरांगे यांचे आंदोलन सामाजिक असून त्याला राजकारणाशी जोडू नये. सत्तेमुळे समाजाला न्याय मिळतो, अशी सूचना त्यांनी केली. दरम्यान, एका मतदारसंघातून एक व्यक्तीच उमेदवारी अर्ज भरू शकते. ज्यांनी नाराज होऊन अधिकृत उमेदवाराविरुद्ध अर्ज भरले आहेत, त्यांनी ते मागे घ्यावेत. अर्ज मागे घेणार नाहीत त्यांच्यावर पक्ष कारवाई करेल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.