

Vijay Wadettiwar on Bachchu Kadu
नागपूर : प्रहार संघटनेचे अध्यक्ष व माजी मंत्री बच्चू कडू शेतकऱ्यांचे नेते आहेत, मात्र ‘ आमदारांना कापून टाका’ अशी भाषा योग्य नाही. त्यांची भावना शेतकऱ्यांच्या हिताची असली तरी आत्महत्या न करता मतदानाच्या अधिकाराने बदल घडवता येतो. मतदानाचा अधिकार तलवारीपेक्षाही धारदार आहे, असे मत काँग्रेसचे विधीमंडळ गट नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केले.
वडेट्टीवार म्हणाले, “पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळण्याऐवजी सरकारच्या तिजोरीत जात आहेत. बच्चू कडूंचा रोष योग्य दिशेने असला तरी शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग न स्वीकारता लोकशाही मार्गाने लढा द्यावा. शेतकऱ्यांना पीकविम्याचे पैसे मिळत नाहीत आणि आकडे फुगवून सांगितले जात आहेत.
दोन सप्टेंबरचा जीआर रद्द करायला हवा. पात्र हा शब्द काढल्यामुळे अन्याय झाला आहे. ओबीसी प्रमाणपत्र एकदा मिळाल्यावर ते राज्यात कुठेही वैध असते. चार जिल्ह्यांसाठी असलेला जीआर ही मर्यादा ठरवतो, पण त्याचा वापर महाराष्ट्रभर करता येतो. सत्तेतील मंत्र्यांना हे साधं तत्व समजत नसेल तर त्यांच्या बुद्धीला काय म्हणावं! ओबीसींचे खरे रक्षणकर्ते कोण आहेत हे जनता ठरवेल.
ते पुढे म्हणाले, “जीआरमध्ये काही विचित्र कागदपत्रांचा उल्लेख आहे. एखादा मागासवर्गीय व्यक्ती बैलपोळा साजरा करतो का किंवा लुगडं, पगडी घालतो का हे विचारणे हास्यास्पद आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी ५० टक्के आरक्षण मर्यादा हटवून जनगणना करण्याची मागणी करत आहेत, त्यामुळे प्रश्न सुटेल.
वडेट्टीवार म्हणाले, “आज मंत्री पदावर बसलेले लोक कोणाच्या कृपेने बसले आहेत, हे लक्षात ठेवावं. 26 व्या मजल्यावर राहता, पण या पदावर कोणाच्या पुण्याईने आला आहात याचा विचार करा. आमचं आरक्षण कोर्टामुळे वाचलं, सरकारमुळे नाही. कोर्टाने जनगणना करण्यास सांगितलं, पण सरकारने ती केली नाही. जुन्या पद्धतीने निवडणुका घेण्यास कोर्टाने वैतागून परवानगी दिली. त्यामुळे 27 टक्के आरक्षण टिकलेले नाही. ओबीसी समाजाला भ्रमित करू नका, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.
ते पुढे म्हणाले की, “ओबीसी विद्यार्थ्यांसाठी सरकारकडे निधी नाही. वसतिगृहात फक्त चॉकलेट वाटली जात आहेत. इमारती बांधण्यासाठी पैसे नाहीत. 7 टक्के लोकांसाठी एवढाच पैसा का? सरकार विद्यार्थ्यांना 12 मजल्यांवरून उडी मारण्याची वेळ आणत आहे का? दीड लाख विद्यार्थ्यांसाठी 500 कोटीही देता येत नाहीत. 36 वसतिगृह केवळ कागदावर आहेत. ‘महाज्योती’ ही योजना मी सुरू केली होती, पण तिला अडथळे आणण्यात आले. आम्ही 1300 विद्यार्थ्यांना फेलोशिप दिली, आता तो आकडा वाढवला जात आहे. मात्र 2 सप्टेंबरच्या जीआरपासून पुन्हा लोकांना ‘लॉलीपॉप’ दाखवला जात आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.
सरकारला रोजगार देता येत नाही म्हणून वैदिक पद्धतीने शिक्षण घ्या असा सल्ला दिला जात आहे. या नव्या धोरणामुळे विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त होईल. ही पॉलिसी वाचली तर कळेल की मुलांना भविष्यात नोकरीच मिळू शकत नाही. पुन्हा वडाच्या झाडाखाली नेऊन गुलामासारखं जीवन जगायला लावण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका वडेट्टीवारांनी केली.
“मतदार याद्यांमध्ये बोगसगिरी सुरू आहे. राहुल गांधींनी या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. निवडणूक आयोगाकडे आम्ही प्रतिनिधी म्हणून गेलो होतो. स्थानिक पातळीवरील आघाड्यांचे विषय हे राष्ट्रीय नाहीत,” असे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीमध्ये प्रचंड कुरघोडी आहे. एकाला शेतीत अडकवले आहे, दुसऱ्याला बारामतीत. प्राण्यांना पकडण्यासाठी जसे जाळे लावतात तसेच राजकीय जाळे इथे लावले जात आहे. महाराष्ट्र कुठे चालला आहे, हे आता जनतेने ठरवावे, असे वडेट्टीवार म्हणाले.