

नागपूर : ओबीसी समाजातील 374 जातींना धोक्यात टाकणारा 2 सप्टेंबरचा शासननिर्णय (जीआर) तात्काळ रद्द करा, अन्यथा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना एके-47 देऊन आम्हाला संपवा, अशा शब्दांत काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
शनिवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली होती. मात्र, त्यामध्ये जीआरविषयी कोणताही ठोस निर्णय न झाल्याने ओबीसी समाज असंतोष व्यक्त करीत आहे. याच पार्श्वभूमीवर विविध ओबीसी संघटनांच्या वतीने 10 ऑक्टोबर रोजी नागपुरात महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
वडेट्टीवार म्हणाले की, मोठ्या प्रमाणात मराठा समाजाचे ओबीसीकरण सुरू असून खोट्या प्रमाणपत्रांच्या आधारे आरक्षणाचा गैरवापर होतो आहे. सरकारने एका व्यक्तीच्या धमक्यांमुळे संपूर्ण समाजाचे नुकसान करू नये. जरांगे यांना अटक करून कायदा सुव्यवस्था टिकवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही, मात्र ते ईडब्ल्यूएसमधून मिळू शकते. ओबीसींच्या वाट्याला येणाऱ्या आरक्षणात त्यांना सामील करणे अन्यायकारक आहे, असे ते म्हणाले.
सरकारला वारंवार सांगूनही जीआर रद्द करण्याची तयारी दिसत नाही. उलट सरकार आमची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. बैठकीत वकील संघटनांचे पदाधिकारीही उपस्थित होते, त्यांनी देखील सरकारला पटवून देण्याचा प्रयत्न केला, पण उपयोग झाला नाही, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली.