

Farmers Tractor March Nagpur
नागपूर: सात बारा कोरा करा, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना सहा हजार मानधन तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय्य हक्कांसाठी महाएल्गार आंदोलन २८ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे होणार आहे. आज बच्चू कडू यांनी ट्रॅक्टर चालवित नागपूरच्या दिशेने आगेकूच सुरू केली.
हजारो ट्रॅक्टर, ढोल-ताशांचा गजर, झेंडे फडकवणारे शेतकरी यानिमित्ताने नागपूर हैदराबाद महामार्गावर चक्काजाम होण्याची शक्यता आहे. ठिकठिकाणी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे. हा महाएल्गार शेतकऱ्याच्या न्यायाचा आहे, ही लढाई शेवटची आहे. आम्ही मागे फिरणार नाही, असा इशारा यांनी दिला आहे. बेलोरा-आडगाव-यावली शहीद-मार्डीमार्गे वर्धा येथे आज सोमवारी मुक्काम करीत मोर्चा २८ ऑक्टोबर रोजी नागपूर बुटीबोरी येथे धडकणार आहे. रॅलीचा प्रत्येक ट्रॅक्टर “जय जवान, जय किसान” आणि “तिरंगा झेंडा” फडकवत स्वाभिमानाच्या घोषणांनी लक्ष वेधून घेणार आहे.
शेतकरी, दिव्यांग, मेंढपाळ, मच्छीमारांचा एल्गार
या रॅलीत हजारो ट्रॅक्टर, बैलबंड्या आणि मेंढपाळ बांधवांचा सहभाग आहे. सोलापूरहून २० हजार भाकऱ्या, मिरची आणि शेंगदाण्याचा खरडा, नाशिकहून कांदा व भाजीपाला, लातूरहून तूरडाळ, इतर भागातून हुरडा व अन्नधान्य पोहोचवण्याची व्यवस्था झाली आहे. गावोगावात चिवडा बनवण्याचे काम सुरू आहे.
“कोरा सातबारा” अजून कोरा!
“शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू” अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने शेतकऱ्यांना आजतागायत दिलासा दिला नाही. ना कर्जमाफी, ना हमीभाव उलट केंद्र सरकारच्या चुकीच्या आयात-निर्यात धोरणामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. कापसाची आयात वाढल्याने देशांतर्गत भाव कोसळले, तर सोयाबीनचा किमान आधारभूत भाव ₹५३३५ असूनसुद्धा शेतकऱ्यांना फक्त ₹५०० ते ₹३००० दरम्यान विक्री करावी लागते.हा कोणता आत्मनिर्भर भारत?” असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
बच्चू कडूंच्या नेतृत्वाखाली याआधीही राज्य हलवणारी आंदोलनं झाली आहेत. रायगडाच्या पायथ्याशी तीन दिवस अन्नत्याग, लोकप्रतिनिधींच्या घरावर टेंबा आंदोलन, मोझरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सान्निध्यात सात दिवस अन्नत्याग, डॉ. भाऊसाहेब देशमुखांच्या पवित्र भूमीतून पापड ते चिलगव्हाण पायदळ वारी, आणि महाराष्ट्रभर ४,९०० किमीची शेतकरी हक्क यात्रा लक्षवेधी ठरली.
१८२ किमी जनशक्तीचा प्रवास
या आंदोलनाचा बेलोरा ते नागपूर असा १८२ किलोमीटरचा प्रवास असून अडगाव, यावली शहीद, डवरगाव फाटा, वर्धा, पवनार, सेलू, केळझर, खडकी आणि शेवटी बुटीबोरी येथे हा प्रवास थांबेल.
यावेळी राज्यातील सर्व प्रमुख शेतकरी नेते एकत्रित मंचावर दिसणार आहेत. यात शेतकरी नेते विजय जावंधिया, माजी आमदार अॅड, वामनराव चटप (स्वतंत्र भारत पक्ष), राजू शेट्टी (राष्ट्रीय अध्यक्ष, स्वामिनाथन शेतकरी संघटना), महादेव जानकर (राष्ट्रीय अध्यक्ष, राष्ट्रीय समाज पक्ष), डॉ. अजित नवले (अखिल भारतीय किसान सभा), बच्चू कडू (प्रहार जनशक्ती पक्ष), राजन क्षीरसागर (अखिल भारतीय किसान सभा - प्रगत मंच), प्रकाश पोहरे (अध्यक्ष, किसान ब्रिगेड), दीपक केदार ( ऑल इंडिया पॅंथर सेना), प्रशांत डिक्कर (स्वराज्य पक्ष), विठ्ठलराजे पवार ( शरद जोशी विचार मंच, शेतकरी संघटना) यांचा प्रामुख्याने समावेश आहे.