

Bacchu Kadu On Devendra Fadnavis:
नागपुरात सुरू असलेलं शेतकरी आंदोलन अधिक तीव्र झालं आहे. आज शेतकरी भव्य मोर्चाचा तिसरा दिवस असून अजूनही शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत ठोस असा काही निर्णय झालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी एएनआयशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तीव्र शब्दात टीका केली. त्यातबरोबर त्यांनी आंदोलन आता कोणत्या दिशेनं पुढं जाणार याची देखील माहिती दिली.
एएनआयशी बोलताना बच्चू कडू म्हणाले की, 'शेतकऱ्यांच्या आंदोलनाला दोन दिवस झालेत आज तिसरा दिवस आहे. तिसऱ्या दिवशी आम्ही रेल्वे जाम करणार आहोत.' देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना बच्चू कडू म्हणाले, 'मला वाटतं की देवा भाऊंना आम्हा शेतकऱ्यांचं रक्त जास्त आवडतं. त्यांना जेवढे दिवस शेतकरी थांबतील तेवढे ते तडफडतील. आम्ही शेतात आत्महत्या करून मरतच आहोत आता इथं...'
दरम्यान, बच्चू कडू प्रतिक्रिया देत असतानाच काही गोंधळ झाला. त्यावेळी ते रूग्णवाहिकेला बोलवा असं म्हणताना देखील दिसले. त्यानंतर खांद्यावर शेळीचं पिल्लू घेतलं होतं. त्यानंतर त्यांनी आपली प्रतिक्रिया पूर्ण करत आम्ही आज दुपारी १२ वाजता रेल्वे जाम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले, 'आज आम्ही दुपारी १२ ते १ वाजता रेल्वे जाम करणार आहोत. जर सरकार निर्णय घेतला नाही तर हे होणार.' त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येणार आहे. याबाबत विचारलं असता त्यांनी आज पीएमजी आमच्या महाराष्ट्रात येणार आहेत. त्यांनी मी शेती मालाची किंमत दुप्पट करणार, उत्पादन दुप्पट करणार असं सांगितलं होतं. मात्र यातलं काही झालं नाही.'
'शेतकरी अजून जास्त कर्जात बुडत चालला आहे. जर राज्य सरकारकडं पैसे नसतील तर केंद्रानं मदत करावी. मोदीजी तुम्हाला तर शेतकऱ्यांचं भलं व्हावं असं वाटत होत. तुम्ही जय जवान जय किसान असा नारा देत होता. कुठं गेला तुमचा तो नारा.'
बच्चू कडू यांनी दुपारचं जेवण करून आम्ही रेल्वे जाम करणार असा इशारा देखील दिला.