

Chandrashekhar Bawankule Statement on Amravati Crime
नागपूर : अमरावतीतील महिला अत्याचार प्रकरण अत्यंत गंभीर असून त्यातील दोषींना कठोरात कठोर शिक्षा दिली जाणार असल्याचे महसूल मंत्री, अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (दि.१४) माध्यमांशी बोलताना सांगितले.
बावनकुळे म्हणाले, हे प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांशी तातडीने चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेची दखल घेतली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी पुरावे पोलिसांकडे सादर केले असून सखोल चौकशी सुरू आहे. हा अत्यंत संवेदनशील आणि गंभीर विषय असून सरकार याकडे पूर्ण गांभीर्याने पाहत आहे.
दरम्यान, रोहित पवार यांच्या वक्तव्यावर बावनकुळे म्हणाले ,रोहित पवार यांनी काय वक्तव्य केले, याबद्दल मला माहिती नाही. माध्यमांमध्ये आपले अस्तित्व टिकवण्यासाठी ते बोलत असतात, त्यावर भाष्य करण्याची गरज नाही.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कॅबिनेट बैठकीत अनुपस्थितीबाबत त्यांनी स्पष्ट केले की, मंगळवारी होणारी बैठक सोमवारी घेण्यात आली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही नियोजित कार्यक्रम असल्यामुळे ते उपस्थित राहू शकले नसावेत. मलाही नियोजित कार्यक्रमामुळे उपस्थित राहता आले नाही.
राज्यात वाढत्या ड्रग्सविरोधी कारवायांबाबत बावनकुळे म्हणाले, आमचे सरकार प्रत्येक घटनेवर कारवाई करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात ड्रग्सविरोधात कारवाईचे मोठे जाळे उभे करण्यात आले असून कुणीही त्यातून सुटणार नाही.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या आरोपांवर बोलताना त्यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी विधिमंडळात खरात बाबत संपूर्ण वस्तुस्थिती मांडली आहे. कोणाकडेही पुरावे असतील तर ते एसआयटीकडे द्यावेत. विनाकारण आरोप करून चौकशी भरकटवण्याचा प्रयत्न योग्य नाही.
नाशिक प्रकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच नाशिक आयजींच्या फोटोबाबत कोणतेही निष्कर्ष काढण्यापूर्वी एसआयटी चौकशीची प्रतीक्षा करावी.जयंत मुनी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, शस्त्रपूजा ही परंपरेचा भाग आहे, मात्र कोणत्याही प्रकारचे समर्थन करता येणार नाही. त्यांनी नेमके काय म्हटले हे माहित नाही असा सावध पवित्रा घेतला. महिला अधिनियमातून महिलांच्या सक्षमीकरणाला चालना मिळेल असेही बावनकुळे म्हणाले.