Ajit Pawar
नागपूर : दोन वर्षापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला होता. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि अजित पवार हे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले होते. या सत्तानाट्यावर आज (दि. 19) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भूमिका का घेतली, हे स्पष्ट केले. वैयक्तिक नात्यांच्यामध्ये वेदना का स्वीकारल्या? याच उत्तर अजित पवार यांनी नागपूर येथे राष्ट्रवादीच्या (अजित पवार गट) चिंतन शिबिरात दिले.
नागपूरमध्ये राष्ट्रवादीचे चिंतन शिबिर सुरू आहे. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, "आपण भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारमध्ये आहोत. अनेक लोकं मला विचारतात की आपण हे पाऊल का टाकलं? वैयक्तिक नात्यांच्यामध्ये वेदना आपण का स्वीकारल्या? पण मनापासून सांगतो, ही सत्ता किंवा पदांच्यासाठी उचलेलं पाऊल नव्हतं. महाराष्ट्राला प्रगती, स्थिरता आणि ठोस निर्णयाची गरज आहे. यासाठी हा मार्ग स्वीकारला," असे अजित पवार म्हणाले.
पक्षापेक्षा मंत्र्यांना इतर काम जास्त असतील तर बदल करावा लागेल, असा सज्जड दम अजित पवारांनी पक्षातील मंत्र्यांना दिला. तसेच ज्यांना ज्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद मिळाले आहे त्यांना त्या-त्या जिल्ह्यात जावच लागेल. लोकांमध्ये फिरून काम करावी लागतील, काहीजण केवळ झेंडावंदनला जाऊन दिखावा करतात, अशा कानपिचक्या देखील त्यांनी काढल्या.
अजित पवार म्हणाले की, "याआधी कार्यकर्त्यांनी इतर पक्षात काम केलं असेल, पण शिव-शाहू विचारधारा घेऊन आपण पुढे जातोय. हे शिबिर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपुरत नाही तर पुढच्या पिढीसाठी आहे. संघटना वरच्या पातळीवर मजबूत होत नाही तर, तळागाळात संवाद, प्रभाग सभा, महिला बचत गटांचे उद्योग हे उपक्रम राबविले पाहिजेत. कार्यकर्त्यांनी काम सांगताना यापुढे खरं सांगाव, नाहीतर आमची गडबड होत असते, अस सांगत त्यांनी एका कार्यकर्त्यांचा किस्सा सांगितला.
मोदी आणि फडणवीस यांच्यामुळे राज्याला स्थैर्य मिळालं. मी मराठा जातीत जन्माला आलो असलो तरी सर्व समाजाच्या विकासाची जबाबदारी माझी आणि आपली आहे. आपला पक्ष कुठल्या एका जातीचा, धर्माचा नाही, असेही ते म्हणाले.