

2.5 Crore Theft Nagpur
नागपूर: राजनगर परिसरात पेट्रोल पंप व्यावसायिक बलजींदरसिंग इंद्रजीत सिंग नय्यर यांच्याकडे केवळ 22 मिनिटांत सुमारे अडीच कोटींचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या धाडसी चोरी प्रकरणी चार राज्यात पोलिसांची शोध मोहीम सुरू झाली असताना 24 तासांत अद्यापही या हायटेक घरफोडीचा उलगडा होऊ शकलेला नाही.
नय्यर कुटुंबीयांच्या घरातील दार, प्रत्येक बेडरूम, कपाट अशी इत्यंभूत माहिती असणाऱ्या निकटवर्तीयानेच ही चोरी केल्याचा संशय शहर पोलिसांनी व्यक्त केला आहे. यासाठी मोठी टीप देण्यात आला असावी, असाही पोलिसांचा कयास आहे. पोलिसांनी आतापर्यंत शहरातील जवळपास 25 - 30 कुख्यात घरफोड्यांची झाडाझडती घेतली. मात्र, पोलिसांना ठोस माहिती मिळू शकलेली नाही.
चार राज्यात चोरट्यांच्या शोधासाठी सात पोलिस पथके रवाना झाली आहेत. यातील चार पथके ही मध्य प्रदेश, गुजरात, ओडिसा व हैदराबादकडे गेली आहेत. मध्य प्रदेशातील मांडला येथे एका संशयित चोरट्याची चौकशी करण्यात आली. मात्र, घटनेच्या वेळी तो घरीच असल्याचे आढळून आले. आता पोलीस या परिसरातील सीसीटीव्ही देखील तपासत आहेत.
नय्यर कुटुंबीय एका साखरपुड्याच्या कार्यक्रमात गुंतले असताना चोरट्याने हा डाव साधला. सोने-चांदी, हिरे जडीत दागिने आणि सुमारे 65 लाख रुपये कॅश असा सुमारे अडीच कोटींचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. काही सीसीटीव्हीवर कापड झाकून ठेवल्यानंतरही तो आत येताना आणि बाहेर जाताना एका कॅमेरामध्ये कैद झाला. मात्र प्रत्यक्षात हा चोरटा अद्यापही पोलिसांच्या हाती लागू शकलेला नाही.