हिट अँड रन प्रकरणात ठाणेदारांना हलगर्जीपणा भोवला; एकाचे निलंबन,एकाची बदली

हिट अँड रन प्रकरणात ठाणेदारांना हलगर्जीपणा भोवला; एकाचे निलंबन,एकाची बदली

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : नुकताच दिघोरी टोल नाक्याजवळ मध्यरात्री फुटपाथवर कारचालकाने उडविल्याने दोघांचा मृत्यू झाला तर ७ जण गंभीर जखमी आहेत. या 'हिट अँड रन' प्रकरणात हलगर्जीपणा करणे नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या ठाणेदाराला चांगले भोवले. आरोपींना मदत केल्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी वाठोड्याचे ठाणेदार विजय दिघे यांना तडकाफडकी निलंबित केले असून जरीपटक्याचे ठाणेदार दीपक भीताडे यांना तक्रारदारांशी संवाद न साधता गंभीर गुन्ह्यांकडे दुर्लक्ष केल्याने त्यांची उचलबांगडी अर्थात बदली करण्यात आली.

दिघोरी नाका चौकात सोमवारी(दि.१७) मध्यरात्री वाढदिवसाच्या पार्टीतून येणाऱ्या मद्यधुंद विद्यार्थ्याने भरधाव कार फूटपाथवर चढवून खेळणी विकून उदरनिर्वाह करणाऱ्या फुटपाथवर झोपलेल्या नागरिकांना चिरडले. अपघातानंतर घटनास्थळावरून पळून जाण्यासाठी कार मागे-पुढे घेतल्याने जखमी अधिकच गंभीर झाले. या अपघातात कांतीबाई गजुड बागडिया (४२, करवली, बुंदी- राजस्थान) आणि सीताराम बाबुलाल बागडिया (वय ३०) हे दोघे ठार झाले तर कविता बागडिया (वय २८), बुलको बागडीया (वय ८), हसीना बागडीया (वय ३), सकीना बागडीया (दिड वर्ष), हनुमान बागडीया (वय ३५), विक्रम उर्फ भूषा (वय १०) आणि पानबाई (वय १५) हे गंभीर जखमी झाले. हसीना नावाच्या चिमुकलीवर अद्यापही मेडिकल रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार विजय दिघे वेळेवर घटनास्थळी उपस्थित झाले नाहीत. यासोबतच आरोपी वंश झाडे (वय १९, रा. योगेश्वरनगर), सन्मय पात्रिकर (वय २०, रा. अंबानगर) अथर्व बानाईत (वय २०, रा. अयोध्यानगर हुडकेश्वर) ऋषिकेश चौबे (वय २०, रा. रामेश्वरी अजनी) अथर्व मोगरे (वय २०, रा. महाल) आणि चालक भूषण लांजेवार (वय २०, रा. दिघोरी यांना तातडीने अटक करण्याऐवजी एका राजकीय नेत्याच्या माध्यमातून पोलीस ठाण्यात हजर करवून घेतले होते. आरोपींच्या रक्ताचे नमुने न्यायवैद्यक प्रयोगशा‌ळेत पाठविण्यास उशीर केला. इतकेच नव्हे तर तपासातसुद्धा हलगर्जीपणा केल्याने ठाणेदार विजय दिघे यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले. त्यांच्या जागी सीमा दाताळकर यांनी वाठोड्याच्या ठाणेदार पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. या अपघाताचा तपास आता पोलीस उपायुक्त विजयकांत सागर यांच्या मार्गदर्शनात करण्यात येणार आहे. जरीपटक्याचे ठाणेदार दीपक भीताडे यांच्यावरही हलगर्जीपणाचा ठपका ठेवत त्यांची बदली विशेष शाखेत करण्यात आली. त्यामुळे अन्य ठाणेदारांमध्ये खळबळ उडाली.

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news