नागपूर : मोतीबाग रेल्वे संग्रहालयाला भीषण आग; वारसा साहित्य जळून खाक | पुढारी

नागपूर : मोतीबाग रेल्वे संग्रहालयाला भीषण आग; वारसा साहित्य जळून खाक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मोतीबाग येथील कडबी चौक येथे असणाऱ्या ऐतिहासिक नॅरोगेज रेल्वे संग्रहालयाला शनिवारी (दि.१०) मध्यरात्री शॉर्टसर्किटने भीषण आग लागली. या आगीत चार खोल्यातील संग्रहालयात ठेवलेले वारसा साहित्य आणि अनेक कागदपत्रे जळून राख झाली. याशिवाय बांधलेले सभागृहही आगीत खाक झाले. यामध्ये ७५ लाखांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. रेल्वे प्रशासनाने यासंदर्भात फॉरेन्सिक तपासाचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, मोतीबाग नॅरोगेज रेल्वे संग्रहालय नव्या पिढीला जुन्या वैभवाची साक्ष देणारी वास्तू असल्याने मोठ्या प्रमाणात लोक येथे भेट देण्यासाठी येत असतात. शनिवारी मध्यरात्री एकच्या सुमारास या संग्रहालयाला शॉर्टसर्किटने आग लागली. ही आग सभागृह आणि व्यवस्थापक कार्यालय तसेच देशविदेशातील नरोगेज हेरिटेज वस्तू ठेवलेल्या खोल्यांपर्यंत पसरली. यामध्ये चार खोल्या जळून खाक झाल्या. आगीत या कार्यालयात ठेवलेली हेरिटेज कागदपत्रे, अनेक मिनी रेल्वे मॉडेल, हेरिटेज पोस्ट स्टॅम्प, सीसीटीव्ही, डीव्हीआर, संगणक, फर्निचर आणि कार्यालयातील रेकॉर्ड सारे जळून खाक झाले आहे. रेल्वे म्युझियममध्ये बांधलेल्या ऑडिटोरियमलाही आग लागली. यामध्ये ७६ खुर्च्या, दोन स्क्रीन आणि प्रोजेक्टर जळून खाक झाले. धूर, आगीचे लोळ दिसल्याने परिसरातील एका व्यक्तीने मनपाला याची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. व आग आटोक्यात आणली.

नॅरोगेज रेल म्युझियमचे व्यवस्थापक क्षीरसागर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आगीत सुमारे ७५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून अनेक हेरिटेज वस्तूंच्या नोंदी आणि वस्तू जळून खाक झाल्या आहेत. आगीचे कारण शॉर्ट सर्किट असल्याचे सांगण्यात येत आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या दोन गाड्या आणि रेल्वेच्या अग्निशमन वाहनाने ही आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच डीआरएम यांच्यासह वरिष्ठ रेल्वे अधिकारी घटनास्थळी पोहोचले व घटनेची पाहणी करत त्यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत.

गतवैभव कसे परत येणार : डॉ प्रवीण डबली

पुन्हा नव्याने येथे संग्रहालय, वास्तू उभ्या होतील मात्र, देशभरातून येणाऱ्या संशोधक, रेल्वेप्रेमी,पर्यटकांसाठी जर्मनीचे नटबोल्ट अशा अनेक दुर्मिळ असलेल्या हेरिटेज वस्तू, यंत्रसामग्री कशी येणार, असा सवाल यानिमित्ताने झेडआरयूसीसीचे माजी सदस्य डॉ प्रवीण डबली यांनी ‘पुढारी’शी बोलताना व्यक्त केला.

हेही वाचा : 

Back to top button