अशोक चव्हाण यांच्यासोबत कोण? विदर्भात काहींचे वेट अँड वॉच, काही पक्षासोबत ठाम

अशोक चव्हाण
अशोक चव्हाण

नागपूर : माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार अशोक चव्हाण यांनी राज्यसभा निवडणूक पार्श्वभूमीवर अखेर काँग्रेसच्या सदस्यत्वाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला. गेले अनेक दिवस भाजप वर्तुळात ही चर्चा असल्याने त्यांची पावले काँग्रेसचा 'हात' सोडून भाजपचे 'कमळ' हाती घेण्यासाठीच पुढे पडत असल्याचे उघड आहे. आता अशोक चव्हाण यांच्यासोबत राज्यात, विदर्भातील कोण कोण काँग्रेस सोडणार आणि भाजपमध्ये जाणार, या चर्चेने जोर धरला आहे.

सोमवारी चव्हाण समर्थक आ. अमर राजूरकर यांनीही राजीनामा दिला. सोमवारी दिवसभरातील राजकीय घडामोडींनी राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली. नागपुरात दोन दिवसांपूर्वी काँग्रेसचे लोकसभा मतदारसंघात दावेदार म्हणून पदाधिकार्‍यांनी पसंती दिलेले आ. विकास ठाकरे यांचे नाव चर्चेत आले; मात्र अनेक वर्षे मी भाजपात जाणार असे बोलले जाते, यात दम नाही, असे ठाकरे यांनी तूर्त स्पष्ट केले. किमान 12-15 आमदार अशोक चव्हाण यांच्यासोबत जाणार असल्याची चर्चा राज्यभर सुरू आहे. उमरेडचे काँग्रेसचे आमदार राजू पारवे यांचेही नाव चर्चेत आहे, पण त्यांना अशोक चव्हाण यांच्यासोबत जाण्यापेक्षा महायुतीतून रामटेकचा लोकसभेचा पर्याय असल्याची माहिती आहे.

विश्वसनीय सूत्रानुसार आज जी नावे पुढे आलीत यात चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील आमदार प्रतिभा धानोरकर यांचेही नाव आहे. गेल्यावेळी काँग्रेसच्या वाट्याला राज्यात आलेली एकमेव लोकसभा जागा चंद्रपूरची होती. दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या या जागेवर प्रतिभा धानोरकर यांचा हक्क असल्याने त्या काँग्रेसचा हात सोडतील का, याविषयीचे गूढ कायम आहे. दुसरीकडे वाशीम जिल्ह्यातील रिसोडचे आमदार अमित झनक, चंद्रपूर जिल्ह्यातील राजुर्‍याचे आमदार सुभाष धोटे, गोंदिया जिल्ह्यातील देवरीचे आमदार सहशराम कोरेटे, मराठवाड्यातील अमर राजूरकर अशी ही यादी आहे.

नेत्यांची अशी आहे भूमिका

अमरावतीच्या आमदार सुलभा खोडके यांचेही नाव चर्चेत आहे, पण त्यांचे पती संजय खोडके यांनीही नकार दिला. अमरावतीचे आमदार रवी राणा यांनी अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आमदार भाजपात जाणार असल्याचा दावा केला आहे. मात्र काँग्रेस आमदार अ‍ॅड. यशोमती ठाकूर यांनी हा दावा निराधार ठरवत शेवटच्या श्वासापर्यंत काँग्रेसमध्ये राहणार असल्याचे जाहीर केले. यवतमाळ जिल्ह्यातील कुणीही चव्हाण यांच्यासोबत जाणार नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा निर्णय दुर्दैवी असल्याचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात दोनदा मंत्रिपद भूषविणारे विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचेही नाव आज चर्चेत आले. आमचे सौहार्दपूर्ण संबंध लक्षात घेता या चर्चा रंगणे स्वाभाविक आहे, पण आपण कुठेही जाणार नाही. मी मतदारसंघात असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news