नागपूर : १११ दुचाकी वाहनांसह अट्टल चोरट्यास अटक | पुढारी

नागपूर : १११ दुचाकी वाहनांसह अट्टल चोरट्यास अटक

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : दुचाकी वाहनांची चोरी करणाऱ्या एका अट्टल चोरट्यास आज (दि.८) नागपूर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन वर्षात चोरी केलेल्या ७७ लाख ७० हजार रुपये किमतीच्या १११ दुचाकी ताब्यात घेण्यात आल्या. ललित गजेंद्र भोगे (वय २४) असे या दुचाकी चोरट्याचे नाव आहे. या चोरट्याने महाराष्ट्रातील एकूण ९ जिल्हात दुचाकी वाहनांची चोरी केल्याचे उघडकीस आल्याचे पोलिस आयुक्त रवींद्र सिंघल यांनी सांगितले.

नागपूर शहर ग्रामीणसह विदर्भातील अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, अकोला, भंडारा आणि गडचिरोली येथून या चोरट्याने तब्बल १११ दुचाकी चोरल्या आणि त्यांची परस्पर विक्री केली. एका दुचाकी चोरीच्या प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला असता तो नागपूर पोलिसांच्या हाती लागला. नागपूर पोलिसांनी आतापर्यंत १११ दुचाकी जप्त केल्या असून त्याच्याकडून आणखी चोरीच्या दुचाकी मिळण्याची शक्यता आहे. वाहन चोरीच्या प्रकरणात ललित याने कुणाचीही मदत घेतली नाही. त्याने एकट्याने या दुचाकी चोरल्या असल्याची माहिती तपासात पुढे आली आहे.

ललित याने गेल्या महिन्यात वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक दुचाकी चोरली होती. दुचाकी मालकाने यासंदर्भात वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. शहरात वाहन चोरीच्या घटना वाढत असल्याने वाडी पोलिसांनी या प्रकरणाचा तपास गंभीरपणे सुरू केला. व त्याच्यापर्यंत पोहचले. सीसीटीव्ही कॅमे-यांची पाहणी करुन त्यामध्ये दिसत असलेला चोरटा हा वाडी मार्गाने अमरावतीच्या दिशेने जात असल्याचे निष्पन्न झाले. या मार्गावरील खाजगी कॅमेऱ्याची पाहणी केली असता या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये दिसत असलेला चोरटा कोंढाळी भागातील ललित भोगे असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या घरात पोलिसांना २० दुचाकी आढळून आल्या. त्यानंतर पोलिसांनी ललितला अटक करून एकुण ९१ चोरीची वाहने जप्त केली. अशाप्रकारे एकुण १११ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात पोलिसांना यश आले असून त्याची किंमत ७७ लाख ७० हजार रुपये इतकी आहे.

Back to top button