कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणार | पुढारी

कोल्हापुरातील राजर्षी शाहू महाराज स्मारकाचे काम वर्षभरात पूर्ण करणार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राला राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा वारसा लाभला आहे. कोल्हापूरच्या शाहू मिलच्या जमिनीवर शाहू महाराजांचे स्मारक उभारण्यात येणार असून येत्या वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत दिली.

कोल्हापूर शहरातील शाहू मिलच्या जागेवर राजर्षी शाहू महाराजांचे स्मारक उभे करण्याची घोषणा तत्कालीन सरकाने डिसेंबर 2022 मध्ये केली होती. त्यासाठी शासनाने निधीही जाहीर केला आहे. मात्र शाहू मिलची जागा राज्याच्या वस्त्रोद्योग महामंडळाच्या ताब्यात असून त्याबाबत शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही, याकडे लक्ष वेधत शाहू महाराजांचे स्मारक कधी पूर्ण होणार, असा सवाल काँग्रेसच्या आमदार जयश्री जाधव यांनी लक्षवेधीच्या माध्यमातून विचारला होता. त्याला उत्तर देताना मंत्री उदय सामंत म्हणाले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे स्मारक उभारावयाची जागा वस्त्रोद्योग विभागाच्या मालकीची आहे. ती जागा कोल्हापूर महापालिकेस हस्तांतरित करण्याबाबत महापालिकेकडून वस्त्रोद्योग महामंडळाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे.

शाहू मिलची जागा हस्तांतरित झाल्यानंतर स्मारकाचा आराखडा आणि त्यासाठी आवश्यक निधी याबाबत योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात येईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची ग्वाही दिली असून आवश्यकता भासल्यास मुख्यमंत्र्यांकडे बैठक आयोजित करण्यात येऊन या कामाला गती देण्यात येईल, असेही सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले.

Back to top button