

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : तीन राज्यांतील भाजपच्या महाविजयानंतर महाराष्ट्रात भाजपचा उत्साह ओसंडून वाहत आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असे भाकीत केले आहे. या विधानानंतर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हेच एकमेव वाघ आहेत. त्यांच्याशिवाय दुसरा कोणताही वाघ राज्यात असूच शकत नाही, असा टोलाही बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
तीन पक्षांच्या महायुती सरकारमध्ये बावनकुळे यांच्या वक्तव्यामुळे अस्वस्थता वाढण्याची शक्यता आहे. भंडारा येथील एका कार्यक्रमात बोलताना फडणवीस हे 2024 मध्ये वानखेडे स्टेडिअमवर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील, असे भाकीतही बावनकुळे यांनी वर्तविले आहे. यासोबतच आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीचे 45 खासदार राज्यातून निवडून येतील, असा दावाही त्यांनी केला आहे. एकीकडे भाजपच्या बड्या नेत्यांकडून आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला 400 पार जागा मिळतील, असा दावा केला जात असताना बावनकुळे यांनी रविवारी राज्यात 45 लोकसभा, 225 विधानसभा आणि 375 लोकसभा जागांचा दावा केला आहे. एकंदरीत यामुळे भाजपातच अस्वस्थता दिसत असल्याचे बोलले जात आहे.