सभांवर बंदी घाला, आरक्षणाचा तिढा सोडवा : विजय वडेट्टीवार | पुढारी

सभांवर बंदी घाला, आरक्षणाचा तिढा सोडवा : विजय वडेट्टीवार

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : मराठा आंदोलक मनोज जरांगे – पाटील रात्री सभा घेत आहेत. मराठा समाजामागे सत्तेतील माणूस आणि ओबीसीमागे दुसरा माणूस असावा, असे बोलतात. स्वतः मात्र हात गुंडाळून बसलेले आहेत. खरेतर आता सभा, विविध इतर बाबी वाढवण्यापेक्षा सरकारने सर्व समाजाच्या सभेला बंदी घालावी व आरक्षणाचा तिढा सोडवावा, असे मत विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी (दि.२४) व्यक्त केले.

धनगर आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावे

वडेट्टीवार म्हणाले,  माझं पोलीस अधिक्षकांशी बोलणं झालं असून धनगर आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे.  तो आंदोलनकर्त्याचा उद्रेक होता.  सर्वांना समान न्याय द्यावा. ही माझी भूमिका आहे. चुकत असेल तिथे कारवाई करावी, जाणूनबुजून कारवाई होत असेल तर चुकीचा संदेश समाजात जाईल, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, येणाऱ्या दिवसात भाजप शिंदे गटाला मजबूर करेल. शिंदे गटाच्या हातात कमळाचे फुल देत, माफी मागत हे जनतेसमोर जातील, असेही वडेट्टीवार म्हणाले. खुला प्रवर्ग संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने आपलं मत नोंदवलं आहे. आरक्षणसाठी मागासलेपणा सिद्ध करावा लागतो. त्या सर्वेक्षणात मागास ठरत नाही, तोपर्यंत आरक्षण देता येत नाही, यावर त्यांनी भर दिला.

कोण कोणाला आव्हान करत आहे, गृहखात्यावर कंट्रोल राहिलेला का नाही? मुख्यमंत्री यांना कोणीतरी पत्र देतात आणि ते व्हायरल होते. सरकारच्या इभ्रतीचे वाभाडे काढण्याचे काम सुरू आहे. तीन पक्षाचे सरकार तीन दिशेला तोंड करून काम करीत आहे. एकमेकांचे तोंड पाहायला तयार नाही, ते पत्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहखात्याला चॅलेंज आहे, असेही ते म्हणाले.

हेही वाचलंत का?

Back to top button