नागपूर : भावाचा जीव वाचविण्यासाठी बहीण एखाद्या यकृत दात्याचा शोध घेत होती. अशातच तिच्या परिचित व्यक्तीने यकृत दाता मिळवू देतो असा विश्वास देत त्यांच्याकडून ४ लाख ५० हजार रुपये घेतले. आणि शब्द न पाळता घेतलेली रक्कमही परत केली नाही. या प्रकरणी पाचपावली पोलिसांनी आरोपी विरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. संदीप शिवदास कोचे (४२, इंदोरा) असे या आरोपीचे नाव आहे.
पाचपावली येथील मेहंदीबाग येथे फिर्यादी श्वेता सुरेश दुबे राहतात. त्यांच्या लहाण भावाला यकृताचा आजार आहे. श्वेता दुबे या भावाचा जीव वाचविण्यासाठी यकृत दात्याचा शोध घेत होत्या. अशातच त्या आरोपी संदीप कोचे याच्या संपर्कात आल्या. त्याने श्वेता यांना मी तुम्हाला लवकरच यकृत मिळवून देतो असे म्हणून विश्वासात घेतले. अडचणीत असताना श्वेता यांना धीर मिळाला, यानंतर संदीपने त्यांच्याकडून २३ एप्रिल २०२३ मध्ये साडेचार लाख रुपये घेतले. मात्र श्वेता यांच्या भावासाठी कुठलाही यकृत दाता मिळवून दिला नाही.
अखेर पैसे देऊन वर्ष झाल्याने श्वेता यांनी पैसे परत मागितले. यावेळी मात्र संदीपने पैसे परत न करता त्यांना शिवीगाळ करत धमकी दिली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर श्वेता यांनी पाचपावली पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपी विरूद्ध कलम ४०६, ४२०, ५०४, ५०६ भादंवि अन्वये गुन्हा दाखल केला आहे.