नगर : पुढारी वृत्तसेवा
कांदा व गुटखा व्यवसायात गुंतवणूक केल्यास २० टक्के जादा परतावा देण्याचे आमिष दाखवत नगरमधील चौघांना श्रीगोंद्यातील दोघांनी ९४ लाखांना फसविले. याबाबत रविवारी (दि. १३) कोतवाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर शब्बीर सय्यद (रा. गांजुरे मळा, कॅनरा बँक, श्रीगोंदा), लतिफ मौला तांबोळी (रा. श्रीगोंदा) अशी आरोपींची नावे आहेत. याबाबत साबीर शौकत शेख (वय ३३, रा. खानका शरीफ दर्गा, झेंडीगेट, अहिल्यानगर) यांनी पोलिसांत फिर्याद दिली.
समीर शेख यांचा मार्केटिंगचा व्यवसाय आहे. त्यामुळे त्यांची समीर शब्बीर सय्यद व लतीफ मौला तांबोळी (रा. श्रीगोंदा) यांच्याशी ओळख झाली होती. मार्च २०२४ मध्ये समीर सय्यद याने फिर्यादी शेख यांच्याशी संपर्क केला. माझा कांदा व गुटख्याचा व्यापार असून, त्यात गुंतवणूक केल्यास तुम्हाला दर महिन्याला वीस टक्के जादा परतावा देऊ.
समीर शेख यांनी मित्रांशी चर्चा केली असता त्यानेही या व्यवसायात गुंतवणूक केली असल्याचे सांगितले. त्यामुळे शेख यांनी १० लाख रुपये समीर सय्यद यास दिले. पहिल्या महिन्यात आरोपीने फिर्यादीला दोन लाख रुपये दिले. त्यानंतर पुन्हा १० लाख गुंतवण्यास सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून शेख यांनी आणखी १० लाख समीर सय्यद यास दिले.
काही दिवसांनी समीर सय्यद व लतीफ तांबोळी यांनी शेख यांना तुमच्या नातेवाईक व मित्रांना या स्कीमची माहिती देत गुंतवणूक करायला सांगा, असे सांगितले. त्या वेळी शेख यांनी आणखी ११ लाख रुपये दिले. त्यांच्या अन्य दोन असे तिघांनी मिळून ४४ लाख रुपये गुंतवणूक केली. या दोघांनी ऑगस्ट महिन्यापर्यंत एकूण ६ लाख रुपये परतावा दिला.
सप्टेंबरमध्ये फिर्यादी शेख यांनी त्या दोघांना सर्व गुंतवलेले पैसे परत मागितले. त्या वेळी समीर सय्यद याने महिना अखेरपर्यंत पैसे देतो असे सांगितले. त्यानंतर मात्र त्याने फोन बंद करून टाकला.
वारंवार फोन करूनही संपर्क न झाल्याने फिर्यादी शेख यांनी आणखी एका मित्राची भेट घेतली असता त्यानेही ५० लाख रुपये गुंतविले असून, अद्याप, एक रुपयाही परतवा मिळाला नसल्याचे सांगितले. त्यानंतर फिर्यादी शेख व मित्रांनी श्रीगोंदा येथे जाऊन चौकशी केली असता सय्यद व तांबोळी यांचा कोणताच व्यापार नसल्याचे समजले. त्यावरून चौघांची ९४ लाखांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
कांदा व गुटखा व्यवसायात परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याबाबत अगोदर तक्रार अर्ज आला होता. पोलिसांनी त्या अर्जाची चौकशी करून गुन्हा दाखल केला.
या गुन्ह्यात नगरमधील आणखी काही लोकांची फसवणूक झाल्याची शक्यता असून, त्यात मोठी नावे असल्याचे समजते. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.