Nagpur Municipal Election : नागपूर मनपा निवडणूक: बहुरंगी लढतीत साऱ्यांचीच कसोटी

Nagpur Municipal Election : नागपूर मनपा निवडणूक: बहुरंगी लढतीत साऱ्यांचीच कसोटी
Published on
Updated on

नागपूर : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील महापालिकेतील प्रभाग रचना  बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी चार सदस्यीय प्रभागरचनेत नागपूर महापालिकेत भाजपला फायदा झाला. मनपातील सत्ता कायम राखण्याच्या दृष्टीने पुन्हा हीच प्रभाग रचना कायम ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे समजते. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजप, काँग्रेसला फायदा तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला (ठाकरे गट) मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. १९ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन, जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा आणि दहावी, बारावीच्या परीक्षा लक्षात घेता महापालिका निवडणुका (Nagpur Municipal Election) मार्च, एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे.

यापूर्वी नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत (Nagpur Municipal Election) शिवसेनेचे दोन आणि राष्ट्रवादीचा एकच उमेदवार निवडून आला होता. महाविकास आघाडी सरकारने प्रभागांची रचना बदलताना सदस्यांची संख्या वाढवली होती. आघाडीने काही प्रभागाची रचना आपल्या राजकीय सोयीची केली असा आक्षेप होता. महाविकास आघाडी एकत्र लढली असती, तर काँग्रेससह राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या वाढली असती, असा अंदाजही व्यक्त केला गेला. भाजपला पुन्हा सत्ता कायम राखण्याचा तर काँग्रेसने केलेल्या सर्व्हेत ६० टक्के जागा जिंकण्याचा अंदाज वर्तविला गेला. त्यामुळे आघाडीचे उमेदवार चांगलेच उत्साहात होते. मात्र, राज्यात सत्ताबदल होताच शिंदे-फडणवीस सरकारने ठाकरे सरकार, महाविकास आघाडीचे निर्णय रद्द करण्याचा सपाटा लावला. याच मालिकेत प्रभाग रचना बदलवण्याचा निर्णय घेतला गेला. नगरविकास विभागाने जुनी प्रभाग रचना रद्द करुन नव्याने करण्याचे निर्देश दिले आहेत.

नागपूर महापालिकेत सध्या प्रशासकराज आहे. यापूर्वीच्या निवडणुकीत भाजपचे सर्वाधिक १०८ तर काँग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले. या खालोखाल १० नगरसेवक बसपाचे होते. राष्ट्रवादीने फक्त खाते उघडले. तर शिवसेनेची संख्या दोनवरच थांबली होती. आता भाजप आणि शिवसेनेचे संबंध टोकाला गेल्याने भाजपची मदतही यावेळी शिवसेनेच्या उमेदवारांना होणार नाही. दुसरीकडे शिंदे सेना आणि मनसेसुद्धा सक्रिय झाली आहे. महापालिकेत सर्वच प्रभागात उमेदवार उभे करण्याचा निर्णय दोन्ही पक्षाने घेतला आहे. अर्थातच ते शिवसेनेच्याच मतांची विभागणी करणार आहेत. ठाकरे गटाचे अनेक महत्वाचे पदाधिकारी खासदार कृपाल तुमाने यांच्यावर विश्वास ठेवत शिंदे सेनेत दाखल झाले आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या शहरातील अस्तित्वासाठी यंदाची मनपा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे.

दुसरीकडे त्यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये, याची काळजी भाजपतर्फे घेतली जाणार असल्याची माहिती आहे. शिंदे-फडणवीस सरकार एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जाणार आहे हे विशेष. आम आदमी पार्टीतर्फेही या निवडणुकीसाठी वार्डनिहाय जनसंपर्क सुरू झाला आहे. भाजप-काँग्रेसची थेट लढत असली, तरी मनपाच्या बहुरंगी लढतीत साऱ्यांचाच कस लागणार आहे.

हेही वाचलंत का ? 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news