अमरावती, पुढारी वृत्तसेवा : सातपुडा पर्वतरांगेत वसलेल्या मेळघाटातील आदिवासी बांधवांना जगदंबेच्या दर्शनासाठी माहूरला जाणे शक्य होत नव्हते. त्यामुळे खुद्द जगदंबा माता सातपुड्याच्या पायथ्याशी प्रकटली, अशी आख्यायिका आहे. हीच जगदंबा म्हणजे जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात असणारी मुर्हादेवी होय. (Murha Devi) विशेष म्हणजे, देशात हरिजनांसाठी मंदिर खुली करावी यासाठी महात्मा गांधींनी सुरू केलेल्या चळवळी दरम्यान देशातील सर्वात प्रथम हरिजनांसाठी खुले झालेले मंदिर हे मुर्हा देवीचेच आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मुर्हादेवीच्या पूजेचा अधिकार फक्त महिलांनाच आहे.
मुर्हादेवीच्या पूजेचा अधिकार जुन्या परंपरेनुसार केवळ महिलांनाच आहे. लहान मुलांना देखील गाभाऱ्यात प्रवेश दिला जात नाही. संपूर्ण पूजा विधी हा महिलांकडूनच केला जातो. विशेष पूरातत्व विभागाच्या देखरेखीखाली पाच वर्षांपूर्वी देवीच्या मूर्तीला वज्रलेप लावण्यात आला होता. तो वज्रलेप अमरावती शहरातील नीलिमा वानखडे यांनी लावला. पुरातत्त्व विभागाच्या अधिकारऱ्यांच्या वतीने देवीच्या मूर्ती समोर लावलेल्या पडद्याच्या मागून दिलेल्या सूचनेप्रमाणे नीलिमा वानखडे यांनी मूर्तीला वज्रलेप लावला. वज्रलेपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मोठा धार्मिक विधी करून देवीची पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली अशी माहिती मंदिराचे विश्वस्तांनी दिली.
पुरातत्व विभागाच्या माहितीनूसार, मुर्हा येथील देवी आठशे वर्ष जुनी आहे. देवीची मूर्ती पाषाणाची पूर्णकृती मूर्ती आहे. पूर्णकृती मूर्ती तसेच जागृत देवस्थान असल्याने महिलेच्या हातून येथे देवीला अभिषेक आदी पूजा केली जाते. महिलांची तिसरी पिढी मुर्हा देवीची पूजा करीत आहे. साधारणत: शंभर वर्षांपूर्वीपासून महिलांच्या हातून पूजा होत असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली. सर्वप्रथम मुर्हा येथे सून म्हणून आलेल्या साळुंखाबाई राऊत यांनी शंभर वर्षांपूर्वी देवीची पूजा केली. त्यावेळी त्यांचे वय 72 होते. त्यांच्यानंतर त्यांची मुलगी सत्यभामा कळसकर यांना पूजेचा मान मिळाला. त्यानंतर त्यांची मुलगी संगीतात एमबीएड असलेल्या पद्मा नवले यांना देवीच्या पूजेचा मान मिळाला. नवले यांनी नोकरीचा त्याग करीत देवीची भक्ती आरंभली. देवीची पूजा होत असताना गाभाऱ्यात असलेल्या महिलांना देखील या पूजेचा मान मिळतो. मात्र, पुरुषांना यावेळी मंदिरात प्रवेश दिला जात नाही.
मुर्हादेवीची मूर्ती ही सुमारे आठशे वर्षांपूर्वीची असल्याचे पुरातत्त्व विभागाचे म्हणणे आहे. या देवीबाबत अशा दोन आख्यायिका सांगितल्या जातात. यापैकी एका आख्यायिकेनुसार सातपुडा पर्वत रांगेत मेळघाटात वसलेल्या आदिवासी बांधवांची माहूरच्या देवीवर गाढ श्रद्धा होती. मात्र, मेळघाटातून माहूरला जाणे अतिशय कठीण होते. आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी खुद्द जगदंबा माता सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी प्रकटली. या जगदंबा मातेला मेळघाटातील आदिवासी बांधव मुर्हाई देवी म्हणून मानतात. नवरात्रोत्सवात मेळघाटातून अनेक आदिवासी बांधव प्रचंड संख्येने मुर्हाई देवीच्या दर्शनासाठी परंपरेनुसार आज देखील येतात.
या देवी संदर्भात आणखी एक आख्यायिका सांगितली जाते. ती म्हणजे, अंजनगाव सुर्जी आणि लगतच्या परिसरात मुर्हा नावाच्या दैत्याची दहशत होती. या दैत्याचा विनाश करण्यासाठी जगदंबा माता प्रकटली आणि तिने या मुर्हा नावाच्या दैत्याला साखळदंडाने बांधून परिसरातील एका विहिरीत कैद केले. आज देखील चैत्र पौर्णिमेच्या रात्री या विहिरीतून आवाज येतो असे सांगितले जाते. विशेष म्हणजे, ती विहीर अनेक दिवसांपासून बंद करण्यात आली आहे. त्यावर महादेवाची पिंड आणि नंदीची स्थापना करण्यात आली आहे. विहिरीवर महादेवाची पिंड आणि नंदी असणारे हे एकमेव ठिकाण असल्याचे मुर्हा देवी संस्थानचे पदाधिकारी सांगतात.